कोल्हापूर - वीज बिलांसंदर्भात महाविकास आघाडीचे सरकारने लोकांची दिशाभूल केली आहे. याची चर्चा विधानसभेत झाली असती तर त्यांची चिरफाड झाली असती. १०० युनिट बिल माफी व छोट्या उद्योगांना सवलती द्याव्या लागतील, या सवलती टाळण्यासाठी त्यांनी अधिवेशन संपताच वीज तोडणीचा निर्णय स्थगित केला. हा निर्णय चुकीचा आहे. याचे तीव्र पडसात येणाऱ्या काळात उमटतील, असा इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला.
जनतेची दिशाभूल केली -
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घेतलेल्या निर्णयाबद्दल अतिशय तीव्र नाराजी आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, कारखानदार यांच्यात नाराजीचा सूर आहे. एकीकडे अधिवेशनात शेतकऱ्यांना, कारखानदारांना मदत करण्याचा गप्पा ठोकल्या जातात. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांची वीज तोडणार असल्याचा निर्णय जाहीर करतात. ही राज्यसरकारने केलेली दिशाभूल आहे, अशी टीका आमदार आवाडे यांनी केली.
कोरोनामुळे वर्षभर शेतकरी, कारखानदार, सर्वसामान्य नागरिक, छोटे-मोठे व्यावसायिक त्रस्त आहेत. त्यांना अधिवेशनात दिलासा देण्याची अपेक्षा होती. मात्र, तसे काही झाले नाही. सर्वसामन्य लोकांना काय अडचण आहे, याच्याशी सरकारला देणे-घेणे नाही, असा टोला आमदार आवाडे यांनी लगावला.