कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांना, त्यांना जे अपेक्षित आहे तेच इतरांनी म्हणावे, असे वाटते. त्यांची चूक दाखवली तर, पत्रकारसुद्धा जेलमध्ये जातील. केवळ त्यांची स्तुती करावी असे त्यांना वाटते. ठाकरे आणि राऊत यांना केवळ भाटगिरी हवी आहे, असा टोला राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात 45 दिवसांत एफआर का दाखल नाही केला, असा सवाल करत आम्ही चुका दाखवतच राहणार. चुका दाखवणे म्हणजे, महाराष्ट्राची बदनामी नव्हे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. महाराष्ट्राची आणि पोलिसांची बदनामी तुम्हीच केली, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणावर अध्यादेश हे उत्तर असू शकत नाही. कारण, कायदा हायकोर्टात टिकला, हे आपले भांडवल आहे. तुमच्या अध्यादेशामुळे तो हक्क घालवून बसाल; त्यामुळे अध्यादेशावर दुसऱ्या दिवशी स्थगिती येईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
महाविकास नव्हे, महाभकास आघाडीला आरक्षण टिकवता आले नाही. राज्य सरकारकडे मराठा आरक्षणाबाबत इच्छाशक्ती नाही. मुळात तिन्ही पक्षात सुसूत्रता नसल्याने आरक्षण कोर्टात टिकले नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत कधी चर्चा केली नाही. काँग्रेसला देखील मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यात रस नसल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे घरी बसून राज्य चालवणारे आहेत. सारथी संस्थेची देखील या सरकारने वाट लावली, असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकारकडून मराठा समाजाला 'उल्लू' बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीकादेखील यावेळी करण्यात आली.
हेही वाचा - शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी २५ उमेदवारांची नावे निश्चित; मुलाखतीनंतर ठरणार नवे कुलगुरू