कोल्हापूर - केंद्राने कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला. निर्यात बंदी उठवली नाही तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने मिळून अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पाठवले असल्याचे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालायत पार पडलेल्या आढावा बैठकीतनंतर ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये कोरोना साहित्य खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे. कोणाची तरी मर्जी सांभाळण्यासाठी खरेदी केली आहे. याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणीही आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
आज (दि. 16 सप्टें.) विभागीय आयुक्त सौरभ राव आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेत याबाबतचे निवेदन दिले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना केलेल्या सूचनांचा पुढे काय झाले ? याचाही त्यांनी आढावा घेतला. या बैठकीत महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते. दरम्यान, महात्मा फुले योजनेमधून नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला पाहिजे, असेही आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
आमदार पाटील पुढे म्हणाले, मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. फडणवीस यांनी भाजप मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारच्या बरोबर असल्याची या आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, ज्यावेळी गरज होती त्यावेळी विरोधकांचे मत घेतले नाही, अशी खंत सुद्धा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - मराठा आरक्षण : उद्या मुंबई-पुणेला होणारा दूधपुरवठा रोखणार, सकल मराठा समाज आक्रमक