कोल्हापूर - लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने मिळून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना लढ्याबाबत उत्तम काम केले आहे. त्यामुळे हे सर्वजण कौतुकास पात्र असल्याचे सांगत कोरोनाशी लढा देण्यासाठी जिल्ह्यात व्हेंटिलेटर आणि आरोग्यविषयक गोष्टींसाठी पाच कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. शिवाय संभाव्य पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी रिमोटवर आधारित यु बूट आणि 40 एचपी क्षमतेच्या 25 बोटी उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे मंत्री वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पूर परिस्थिती आणि कोरोना साथ रोग प्रतिबंधासाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले, कोरोनाच्या फार मोठ्या संकटाला थोपवण्याचे काम कोल्हापूर जिल्ह्याने केले आहे. त्यामुळे कोरोना लढ्यातील योद्धे अभिनंदनास पात्र आहेत. जिल्ह्याचा मृत्यूदर 1.6 टक्के इतका असून रुग्णसंख्या बरे होण्याचे प्रमाण सुद्धा राज्यात आघाडीवर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इचलकरंजी येथील काळजी आरोग्य केंद्रासाठी व्हेंटिलेटर ऑक्सिजनची सुविधा, याशिवाय अन्य आरोग्य बाबींचा समावेश असणारा प्रस्ताव वैद्यकीय अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी एकत्रित पाठवा असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
संभाव्य पूर परिस्थितीसाठी एनडीआरएफच्या प्रत्येकी 25 जवानांची तीन पथके जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार होणारा पाऊस लक्षात घेता पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्ह्यातील धरणात असणारा पाणीसाठा मर्यादित ठेवण्याबाबत पाटबंधारे विभागांना सूचना दिल्या आहेत. शिवाय महापुरामध्ये नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी यापुढे ड्रोन कॅमेऱ्याचाही वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला महापौर निलोफर आजरेकर, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील आदी उपस्थित होते.