कोल्हापूर - कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य बालिश आहे. त्यांनी केवळ आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी ते वक्तव्य केले असून कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान देण्याची भाषा करू नये, असे सडेतोड उत्तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना दिले आहे. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
सूर्य, चंद्र असेपर्यंत तो महाराष्ट्राला कधीही मिळणार नाही-
आज कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस आहे. त्यापार्श्वभूमीवर सीमावर्तीय मराठी भाषिकांनी काळा दिवस पाळणार असल्याचे घोषित केले होते. मात्र, कर्नाटक सरकारकडून पोलीस बळाचा वापर करून वारंवार या आंदोलनाविरोधात दडपशाहीचा पवित्रा घेताना दिसून येत आहे. तसेच शनिवारी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असून सूर्य चंद्र असेपर्यंत तो महाराष्ट्राला कधीही मिळणार नाही, असे बेताल वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त होत आहे.
लक्ष्मण सवदी यांच्या या मराठी भाषिकांच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्याचा मंत्री सामंत यांनी समाचार घेतला. एकीकडे आपल्या देशात घुसखोरी सुरू आहेत. त्यांना त्या सीमा बंद करता आल्या नाहीयेत. मात्र महाराष्ट्रातला माणूस एक नोव्हेंबर ला कर्नाटकात जाऊ दिला जात नाही. कर्नाटक सरकारकडून गेल्या अनेक वर्षांपासून आशा पद्धतीने मुस्कटदाबी सुरू असल्याचाही आरोप करत त्यांनी कर्नाटक सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आम्ही महाराष्ट्रातले सर्वच मंत्री काळ्या फिती लावून काम करत असल्याचेही स्पष्ट केले.
सामंत यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदी निवड -
दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सत्कार समारंभासह सेनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, शिवसेनेला गत विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या अपयशनानंतर नवीन उभारीची गरज असून इथले सर्व गट तट बाजूला ठेवण्याच्या सूचना देणार असून लवकरच पुन्हा तीच शिवसेना पाहायला मिळेल. त्यासाठीच आजची बैठक ठेवल्याचे त्यांनी म्हंटले.
हसन मुश्रीफांनीही सवदी यांचा घेतला समाचार -
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असून सूर्य-चंद्र असेपर्यंत तो महाराष्ट्राला कधीही मिळणार, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा समाचार घेत, 'चंद्रसूर्य कशाला तुमच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्याआधी बेळगाव महाराष्ट्रात असेल', असे मुश्रीफ म्हणाले.