कोल्हापूर - गोकुळच्या निवडणुकीत संघाचा चांगला प्रचार करू, असे माझे व पालकमंत्री सतेज पाटील यांचे ठरले होते. गोकुळ संघ हा दूध उत्पादकांच्या मालकीचा राहिला पाहिजे, त्यांना पूर्वीच्या दरापेक्षा दोन-चार रुपये जास्त मिळाले पाहिजे, ही आमची भावना आहे. मात्र, सत्ताधार्यांकडून आमचा अपप्रचार करण्यात येत आहे. जर आम्ही बोलायला लागले तर त्यांना तोंड दाखवता येणार नाही, असा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
निवडणुकीत कोरोनाबाबतचे नियम पाळले जातील
गोकुळ दूध संघाची निवडणूक ही सामान्य निवडणूक नाही. याला कोणत्या सभा वगैरे घ्याव्या लागत नाहीत. दोन्ही पक्षाचे उमेदवार मतदारांना भेटून आले आहेत. भांडवली गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे न्यायालयाचा अपमान न होता या निवडणूक पार पडतील. गोकुळ दूध संघाचे मतदार हे तालुकावार आहेत. करवीर तालुका सोडला तर बाकीच्या तालुक्यात सुमारे साडेतीनशे इतके मतदान आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांना मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर हे नियम बंधनकारक केले जातील, असे म्हणाले.
गोकुळ मोडून खातात हे आमदार पी. एन. पाटील यांनी मान्य केले
गोकुळ दूध संघ मोडून खाल्ला का, बाजार मांडला, हे आम्हाला माहिती आहे. पंधरा ते वीस लाख रुपये नोकऱ्यांचा बाजार आणि टँकर या सर्व गोष्टी ध्यानात आहेत. गोकुळच्या गैर कारभाराबाबत मी संतापून चर्चेवेळी आमदार पी. एन. पाटील यांच्या कानावर घातले होते. त्यांनी ते कारभार झाल्याचे मान्य केले आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
विकासासाठी विरोधकांनाही निधी देतो
विकासासाठी विरोधक जर आमच्याकडे आले तर त्यांना निधी देण्याचे काम मी करतो. मी पक्षपात न करता विकासासाठी सर्वांना निधी देतो. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना चांगली संधी स्वीकारता आली नाही. चंद्रकांत पाटलांना जिल्ह्याचे चांगले काम करण्याची संधी होती. त्यांनी ती संधी घेतली नाही, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.
हेही वाचा - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले 'हे' आवाहन