कोल्हापूर : एमआयएम आणि भाजपचे हातात हात घालून काम सुरू आहे, असा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. मंदिरे-मशिदी कोरोना संकट काळात सुरू करण्याची या दोन्ही पक्षाची मागणी योग्य नाही. मंदिर-मशिद सुरू करायचेच आहेत, मात्र हात जोडतो सांगतो! थोडा धीर धरा, अशी विनंती मुश्रीफ यांनी केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, फडणवीस यांचे कोल्हापुरात स्वागत करतो. त्यांनी कोल्हापुरात येऊन प्रशासनाचे काम पहावे. ज्या उणिवा असतील त्याचा सूचना द्याव्यात. राज्यातील मंदिरे सुरू करण्याबाबत उद्या भाजप घंटानाद आंदोलन करणार आहे. त्यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ते बघता कोरोनाचा उद्रेक होईल अशी मागणी भाजपने करू नये. मंदिरे सुरू करायचीच आहेत पण थोडा धीर धरावा. त्यापेक्षा भाजपने अलमट्टीची उंची वाढवण्याच्या विरोधात कर्नाटक सरकारशी चर्चा करावी. प्रसंग आल्यास आम्ही चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आंदोलनाला कर्नाटकात जाऊ. फडणवीस यांनी आपल्या दौऱ्यात दोन कामं करावी, एक म्हणजे अलमट्टीची उंची वाढवू देऊ नये. दुसरं मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यास येडीयुरप्पा यांना सांगावे, असा टोला देखील मुश्रीफ यांनी यावेळी लगावला.
हेही वाचा - कोल्हापुरात व्हाइट आर्मीच्या जवानावर गुंडांचा हल्ला, अज्ञातांविरोधात गुन्ह्याची नोंद