कोल्हापूर - 'राज्य सरकारच्या भूमिकेमुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोल्हापुरातील बिंदू चौकात जाहीर चर्चा करावी', असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिले होते. ते कोल्हापुरात चक्काजाम आंदोलनात बोलत होते.
यावरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. 'गेल्या पाच वर्षातील भाजपच्या नाकर्त्या धोरणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. त्यामुळेच समाज आता रस्त्यावर आला आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कशा पद्धतीने रद्द झाले? याचे सबळ पुरावे छगन भुजबळ यांच्याकडे आहेत. ते लवकरच याबाबत श्वेतपत्रिका काढणार आहेत. केवळ कोल्हापुरातील बिंदू चौकातच नव्हे तर राज्यातील कोणत्याही व्यासपीठावर याची चर्चा करण्याची तयारी आहे', असे आव्हान हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना दिले आहे.
'आघाडीतील ओबीसी नेता कोण?'
महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसीचा नेता कोण? हे अगोदर ठरवावे. मगच महाविकास आघाडीने केंद्राकडे बोट दाखवावे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला. ते कोल्हापुरातील चक्काजाम आंदोलनात बोलत होते. त्यावरून हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिले. 'आमच्याकडे सामुदायिक नेतृत्त्व आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका', असा पलटवार मुश्रीफ यांनी केला आहे.
बिंदू चौकात चर्चेला या, चंद्रकांत पाटलांचे आव्हान
राज्यभरात आज ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात भाजपने चक्काजाम आंदोलन केले. कोल्हापुरात झालेल्या आंदोलनाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी 'बिंदू चौकात चर्चेला या' हे आव्हान दिले होते.
हेही वाचा - वीज बिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नगरसेवकाकडून जबर मारहाण