कोल्हापूर - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज सकल मराठा समाजाकडून कोल्हापूरातून मुंबई-पुण्याला जाणारे दूध पुरवठा रोखण्याचा प्रयत्न झाला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी थेट गोकुळ शिरगावमधील गोकुळ दूध संघाच्या दारातच ठिय्या मारला. मात्र, मराठा आंदोलकांच्या या पवित्र्याला विरोध करताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी मोठी झटापट झाली. दरम्यान, मराठा समाजाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यास, महाराष्ट्रभर याचा उद्रेक होईल, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. मात्र पोलिसांनी यावेळी आंदोलकांच्या इशाऱ्याला न जुमानता कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
आरक्षणाचा निर्णय घेण्यास अपयशी ठरलेल्या राज्यसरकाराचा येत्या मंगळवारी श्राद्ध घालणार असल्याचे, आंदोलन कर्त्यांनी सांगितले. तसेच राज्यसरकारने जम्बो पोलीस भरती जाहीर केली आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय भरती न करता जाहीर केलेली मेघाभरती थांबवावी, अशी मागणीही मराठा संघटनांनी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलकांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. तसेच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यास, याचे पडसाद राज्यभर उमटतील, असा इशाराही पोलिसांना दिला. यावेळी मात्र पोलिसांनी कठोर भूमिका घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस व आंदोलन कर्त्यामध्ये मोठी झटापट झाली.