कोल्हापूर - गेल्या वर्षीच्या महापुराचा अनुभव लक्षात घेता पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. विभागांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत ८ दिवसात विभागनिहाय आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करावी, असे आदेश सतेज पाटील यांनी दिले. शिवाय, पुराचा धोका ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून यावेळी प्रशासनामार्फत परिस्थितीनुसार ग्रामस्थांचे सक्तीने स्थलांतर करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले.
जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी जिल्ह्यातील धरणांचा सध्याचा पाणीसाठा आणि गतवर्षीचा पाणीसाठा याबाबत माहिती घेतली. ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे बोटी आहेत त्या सर्वांची नोंद ठेवून यादी बनवावी. त्याचबरोबर जिल्हा परिषद, महापालिका अशा विविध शासकीय यंत्रणांच्या बोटींची दुरूस्ती करून त्या सज्ज ठेवाव्यात.
ग्रामीण भागात विशेषत: शिरोळ तालुक्यात गेल्या महापुरात बोटींबाबत काही अडचणी आल्या होत्या. त्याबाबत तयारी ठेवावी. महसूल, आरोग्य, पुशसंवर्धन, महावितरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, कृषी अशा सर्वंच विभागांनी आदर्श कार्यप्रणाली तयार ठेवावी, अशा सूचना सतेज पाटील यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या मान्सूनपूर्व बैठकीतील महत्त्वपूर्ण मुद्दे-
- 15 जुलै ते 31 ऑक्टोबर या कालावधीत शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहाणे बंधनकारक.
- शिरोळ, करवीर, राधानगरी तालुक्यात योग्य ठिकाणे शोधून हेलिपॅड तयार करावेत.
- पशुसंवर्धन विभागाने जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून जनावरांचे सर्वेक्षण करावे.
- पाटबंधारे विभागाने 2005, 2019 च्या महापुराचा अभ्यास करून नियोजन करावे
- 43-44 फूट पातळी झाल्यास नागरिकांचे सक्तीने स्थलांतर करावे.
- मोबाईल कंपन्यांनी यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी पूर्वतयारी ठेवावी.
- खासगी रूग्णालयांनी धोका पातळी पूर्व रूग्ण दाखल करून घेवू नयेत
- बोटींची संख्या वाढवावी.
- मोठी रूग्णालये, मोठ्या गृहनिर्माण संस्था यांनी स्वतंत्र बोटींची व्यवस्था करावी.
- जिल्ह्यातील थार वाहनांची यादी तयार करावी.