कोल्हापूर - मॉरीशस येथील एक विद्यार्थिनी कोल्हापुरातील महावीर विद्यालयात मराठीचे शिक्षण घेत आहे. पूर्वशा सखू, असे विद्यार्थीनीचे नाव आहे. पूर्वशाला लॉकडॉऊनमुळे तिच्या घरी जाता आले नसल्यामुळे ती कोल्हापुरमध्येच थांबली आहे. कॉलेज प्रशासन वसतिगृहामध्ये एकटीच असलेल्या पूर्वशाची काळजी घेत आहेत.
मॉरीशसच्या शिष्यवृत्तीवर भारतात शिक्षण
पूर्वशा मॉरीशसमध्ये बारावीत मराठी विषयात देशात प्रथम आल्याने तिला मॉरिशसची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. याच शिष्यवृत्तीमुळे तिला भारतात येऊन मराठी शिकण्याची संधी मिळाली. पूर्वशा अतिशय चांगली मराठी बोलते.
पूर्वजांनी दोन शतकांपूर्वी सोडला महाराष्ट्र
पूर्वशाचे पूर्वज 200 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून मॉरीशसमध्ये स्थायिक झाले होते. पण, महाराष्ट्रातून नेमक्या कोणत्या जिल्ह्यातून तिचे पूर्वज होते, याची माहिती नसल्याचे पूर्वशा सांगते. महाराष्ट्रातून जावून दोन शतकांचा कालावधी लोटला असला तरी कुटुंबीयांनी मराठी भाषा, संस्कृती जपली आहे. मॉरीशसमधील मराठी कुटुंब गणेशोत्सव, दिवाळी, रक्षाबंधन असे सर्व सण साजरे करत असल्याचे पूर्वशा सांगते.
पूर्वशाचं बारावीपर्यंतचं शिक्षण मराठीत झाले आहे. आई-वडिलांनी मराठी शिकण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मराठी भाषेविषयी प्रेम वाढत गेल्याचे ती सांगते. सध्या ती मराठी साहित्याचा अभ्यास करत आहे. संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराजांविषयी तिने मॉरीशसमध्ये वाचले होते. तर महाराष्ट्रात आल्यापासून ती कुसुमाग्रजांनी लिहीलेले साहित्य, पु. ल देशपांडेंचं साहित्य वाचत आहे.
कोरोनामुळे भारतात लॉकडॉऊन असल्याने तिला मॉरिशसला जाणं शक्य नव्हते. त्यामुळे तिच्या पालकांनी देखील कोल्हापुरातच तिला थांबण्यास सांगितल्याचे पूर्वशा म्हणाली. महावीर विद्यालय प्रशासन तिची पूर्ण काळजी घेत असून तिच्यासाठी वसतिगृह सुरू ठेवण्यात आले आहे. तसेच तिच्या जेवणाची व सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे.