कोल्हापूर - करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावातील जवान संग्राम पाटील यांना काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आले होते. त्यांच्यावर उद्या त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील जवान ऋषिकेश जोंधळे हे हुतात्मा झाल्याची घटना ताजी असतानाच पाटील यांनाही वीरमरण आले. दरम्यान, गावकऱ्यांनी अंत्यविधीची संपूर्ण तयारी केली आहे.
अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण -
उद्या गावातीलच एका शाळेच्या मैदानावर संग्राम पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी संपूर्ण तयारी केली असून अंत्यविधीच्या ठिकाणी चबुतरा बांधण्यात आला आहे. शिवाय याठिकाणी मंडपसुद्धा घालण्यात आला आहे. गावामध्ये सर्वांकडून डिजिटल फलकांच्या माध्यमातून पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, आमदार ऋतुराज पाटील यांनी सुद्धा तयारीची पाहणी करून ग्रामस्थांना विविध सूचना दिल्या आहेत.
अंत्यविधी कार्यक्रम -
सकाळी आठ दरम्यान पाटील यांचे पार्थिव त्यांच्या घरी येईल. सकाळी साडेआठपर्यंत ग्रामस्थ व नातेवाईकांना अंत्यदर्शन घेता येईल. सकाळी साडेआठ ते दहा वाजेपर्यंत सजावट केलेल्या ट्रॉलीमधून गावात अंत्ययात्रा निघेल व दहानंतर संग्राम पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाईल.
हेही वाचा - ...तेल लावलेलं पायताण हाय! कोल्हापूरकरांचा महावितरणला इशारा