कोल्हापूर Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला होत आहे. या निमित्तानं देशभरातील रामभक्तांसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील हुपरी येथील पाटील दाम्पत्यांनी प्रभू श्रीरामाप्रती निस्सीम भक्तीचं दर्शन घडवून सर्वांना अचंबित केलं आहे. दीपक पाटील यांनी 68 व्या वर्षात सायकल वरून अयोध्यापर्यंत सायकल प्रवास केला आहे. तर त्यांच्या पत्नी आशा पाटील यांनी मंदिराच्या भूमी पूजनापासून आजवर 3 लाख 78 हजार हून अधिक 'जय श्री राम' शब्द वहीत लिहून अनोख्या पद्धतीनं भक्तीचं दर्शन घडवलं आहे. येत्या 22 तारखेच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी 4 लाख लिखित जप पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे.
पाटील दाम्पत्याची रामभक्ती : कोल्हापुरातील चंदेरी नगरी अशी ओळख असलेल्या हुपरीत 68 वर्षीय दीपक पाटील आणि त्यांच्या 62 वर्षीय पत्नी आशा पाटील या कुटुंबीयांसोबत राहतात. घरात वारकरी संप्रदाय असल्यामुळं देवाच्या भक्तीचा छंद आहे. या दाम्पत्यानं अयोध्येतील राम मंदिराचा 5 ऑगस्ट 2020 रोजी पायाभरणीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. तेव्हापासून आपल्याला तिथं प्रत्यक्ष जाणं जमणार नाही. पण माझ्या मनातील रामभक्ती तिथंवर पोहोचावी, यासाठी आशा पाटील यांनी एक वही आणि पेन घेऊन 'जय श्री राम' हे शब्द लिहण्यास सुरुवात केली. घरातील कामातून वेळ काढून रोज तीन ते चार पानावर 1200 ते 1500 शब्द लिहून व्हायचे. मागील अडीच वर्षांपासून त्यांची ही दिनचर्या बनली आहे. यात अपवादात्मक काही काळ आजारपणामुळं खंड पडला. मात्र आतापर्यंत त्यांनी 3 लाख 78 हजार हून अधिक वेळा 'जय श्री राम' लिहून आपल्या निस्सीम रामभक्तीचं दर्शन घडवलं आहे. प्रत्येक वहीच्या पाठीमागं त्यांनी बेरीज करुन शब्दांची संख्या लिहिली आहे. इतकंच काय तर यासाठी त्यांनी चार प्रकारचे पेन वापरले आहेत. येत्या 22 जानेवारीपर्यंत राम मंदिर उद्घाटनापर्यंत 4 लाख 'जय श्री राम'चे लिखित जप पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे.
दीड हजार किमी सायकल प्रवास करुन गाठली अयोध्या : दीपक पाटील यांनी दीड हजार किलोमीटरहून अधिकचा सायकल प्रवास 2023 मधील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात वयाच्या 68 व्या वर्षी केला. ते तब्बल 22 दिवस सायकल प्रवास करुन अयोध्यामध्ये पोहचले. एकूण 1 हजार 650 किलोमीटरचा प्रवास त्यांना करावा लागला. पुढं प्रवास सुरू ठेवत त्यांनी काशी विश्वनाथपर्यंत प्रवास केला. विशेष म्हणजे आजच्या आधुनिक युगात हर एक नमुन्याच्या आणि प्रवास सोपा आणि सुखकर करणाऱ्या सायकली उपलब्ध आहेत. तरी देखील त्यांनी आपल्या जुन्याचं सायकलीवरून प्रवास करत आपल्या मनातील राम भक्तीच्या सोज्वळ रुपाचं दर्शन सुद्धा घडवलं. आजवर वयाच्या 63 व्या वर्षापासून सलग सहा वर्ष 16 हजार हून अधिक किमीचा प्रवास त्यांनी याच सायकलीवरून यशस्वीपणे पूर्ण केला आहे. एकूण 65 टक्के भारत सायकलवरुन फिरल्याचा त्यांनी दावा केला. यात 18 राज्यांचा समावेश आहे. त्यांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास असून दोन्ही कानात मशीन घातल्याशिवाय त्यांना ऐकू येत नाही. त्यामुळं घरचा विरोध असतानाही त्यांनी ऊन, वारा, थंडी झेलत हे शिवधनुष्य लिलया पेलून दाखवत तरुणांपुढं एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखलं जातं. पाटील दाम्पत्याचा एक मुलगा राष्ट्रीय कुस्तीपटू आहे. तर आपल्या नातवाला आणि नातीला सुद्धा पैलवान करायचं, असा चंग त्यांनी बांधला आहे. आज त्यांची नातवंडं शाळेसोबतच लाल मातीत कसरती सुद्धा करत आहेत.
हेही वाचा :