कोल्हापूर - नविन वर्षाच्या सुरुवातीलाच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांना भेट दिली आहे. कारण उद्यापासून अंबाबाई मंदिराच्या महाद्वारातून आत येत मुखदर्शन घेता येणार आहे. मंदिर दर्शनासाठी खुले केल्यापासून केवळ एकच दरवाजामधून भाविकांना आतमध्ये येता येत होता. मात्र, आता महाद्वार सुद्धा उघडल्याने भाविकांना मुखदर्शन सुद्धा घेता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी ही माहिती दिली आहे.
मंदिर परिसरातील दुकाने उघडण्याचीही परवानगी -
लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यापासून आजपर्यंत अंबाबाई मंदिर परिसरातील सर्वच दुकाने बंद आहेत. परंतु मंदिराच्या बाहेरच्या बाजूची सर्वच दुकाने सद्या सुरू आहेत. मात्र, घाटी दरवाजा अद्याप बंद असल्याने त्या बाजूचे दुकानदार घाटी दरवाजा उघडण्याबाबत देवस्थान समितीकडे विनंती करत आहेत. त्यापैकी महाद्वार उघडण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेता असून उद्यापासून भक्तांना मुखदर्शन घेता येणार आहे. मंदिर आवारातील दुकानदारांना सुद्धा आपली दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
भाविकांनी नियमांचे पालन करावे -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही 65 वर्षांवरील भक्तांना तसेच लहान मुलांना मंदिरामध्ये प्रवेश देण्यात आला नाही. शिवाय अजूनही प्रत्येक भाविकांची तपासणी केल्यानंतरच सर्वांना त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. यापुढे सुद्धा मुखदर्शन घेण्यासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांनी शासनाच्या सर्वच नियमांचे पालन करावे, असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.
पहाटे 6 पासून रात्री 8 पर्यंत राहणार सुरू -
महाद्वार उघडण्याबरोबरच मंदिराची वेळ वाढवण्यात आली आहे. यापुर्वी सकाळी 8 ते सायंकाळी 8 अशी वेळ होती. ती आता पहाटे 6 ते रात्री 8 अशी करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज 14 तास सलग अंबाबाईचे मंदिर भक्तांसाठी खुले असणार आहे.
हेही वाचा - निरोप 2020: मंबईने देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असतांना दिला लढा