कोल्हापूर - "मी हा कार्यक्रम टाळणार होतो. पण, महाराजांच्या दर्शनाने माझ्यासारख्या महामूर्खाला थोडी बुद्धी येईल, म्हणून मी कार्यक्रमाला आलो"; असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.
अहिंसा यात्रेचे प्रणेते श्वेतांबर तेरापंथ सभेचे आचार्यश्री महाश्रमन यांचे आज कोल्हापूरात आगमन झाले. तीन देश आणि 20 राज्यांमधून पदयात्रा करत ते आज कोल्हापुरात पोहोचले. यावेळी आचार्यश्री महाश्रमन यांच्या राज्यस्तरीय अभिनंदनाचा सोहळा पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, लोक म्हणतात आम्हाला धन-ज्ञान प्राप्त करायचे आहे. मात्र, माझ्या मते प्रत्येकाने व्यसन, खोटे बोलणे सोडून दिले पाहिजे. आपण केलेली साधना कधीही व्यर्थ जात नाही. भारत देश हा एक विलक्षण देश आहे. प्रत्येक देशाची वैशिष्ट्ये वेगळी असतात. भारतामधील लोकांनी धनसंपत्ती कधीही श्रेष्ठ मानली नाही, हे आपल्या देशाचे एक वैशिष्ट्य आहे. जग जिंकण्यासाठी अनेक जण आले, मात्र ते आता कुठे आहेत ते कोणालाही माहित नाही. जे त्याग करतात ते सर्वात सुखी असतात, आणि हीच आपल्या देशाची विशेषतः असल्याचे म्हणत आपल्या देशाने नेहमीच साधूसंतांचा सन्मान केला असल्याचेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, की मुले शिवाजी महाराज, शाहू महाराजांना ओळखतात मात्र ज्यावेळी विनोबा भावेंचे चित्र समोर दाखवले जाते, तेव्हा त्यांना ते ओळखता येत नाही. सत्य प्रवृत्ती, समाजाला जिवंत ठेवणाऱ्या प्रवृत्तीचा तुम्ही सन्मान करत आहात. आपली संस्कृती आजही जोपासत आहे याचा आनंद वाटतो असेही ते म्हणाले.
हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे आहेत त्या पार्टीचा अध्यक्ष मी आहे - रामदास आठवले