कोल्हापूर - केवळ तीन दिवसात कोल्हापूर जिल्हा जलमय होत असेल तर यावर काहीतरी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरवर्षी आपत्ती येत असेल तर लोकांचे जगणेही मुश्कील होणार आहे. त्यासाठी पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे नेण्यासाठी आम्ही यापूर्वीच एक आराखडा दिला होता. त्याला वर्ल्ड बँकेनेही मान्यता दिली होती. मात्र, सरकार बदलले आणि हा प्रश्न तसाच राहिला. जोपर्यंत आपण या पाण्याचा निचरा बोगद्याच्या माध्यमातून पुढे नेऊ शकत नाही तोपर्यंत आंबेवाडी चिखली आणि इतर गावातील पुराचा प्रश्न सुटणार नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवाय याबाबत आता आम्ही पाठपुरावा करू, असे आश्वासनही त्यांनी चिखली आणि आंबेवाडी गावातील पूरग्रस्तांना दिले आहे. यावर्षी सुद्धा कोल्हापुरातील आंबेवाडी आणि चिखली गावांना पुराचा फटका बसला. याबाबत आज (शुक्रवारी) फडणवीस तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी पाहणी केली. शिवाय येथील नागरिकांशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.
'स्थलांतरणासाठी दिलेल्या जागांबाबत ज्या अडचणी आहेत त्याबाबत आवाज उठवू'
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 32 वर्षांपूर्वी चिखली आणि आंबेवाडी गावातील नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी जागा मिळाली आहे. मात्र, अजूनही येथील नागरिकांना अडचणी असल्याने ते स्थलांतरित होऊ शकत नाही आहेत. याबाबत आम्ही पाठपुरावा करू आणि महसूल यंत्रणेला जागे करू. इतकेच नाही तर विधानसभा तसेच विधान परिषदेतही याबाबत आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, सद्या अतिशय अडचणीची वेळ आहे. आपण सर्वजण दुःखात आहोत पण आम्ही आपल्या पाठीशी आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष करू आणि सरकारला आपल्या समस्या सोडवायला भाग पाडू, असे आश्वासनसुद्धा फडणवीस यांनी चिखली आणि आंबेवाडीच्या नागरिकांना दिले.
हेही वाचा - मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी