कोल्हापूर - कोल्हापूरच्या वैभवातील महत्वाची वास्तू असलेल्या जयप्रभा स्टुडिओला महापालिकेने हेरिटेज वास्तू म्हणून निश्चित केले. मात्र, या समावेशाला लता मंगेशकर ( Lata Mangeshkar Passed Away ) यांनी हरकत घेत उच्च न्यायालयात महापालिकेविरोधात दावा दाखल केला. त्यानंतर कोल्हापूरकरांनी केलेल्या विरोधाचा वाद चांगलाच गाजला. स्वतः लतादीदी सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. मात्र, ज्या स्टुडिओमध्ये खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली गेली त्याची हेरिटेज वास्तू यादीतील समावेशाला विरोध दर्शवणारी याचिका त्यांनी मागे घेतली. खरंतर ज्या कोल्हापूरात ( lata mangeshkar relation with Kolhapur ) त्यांनी अनेक वर्षे घालवली त्या कोल्हापूरपासून मात्र त्या हळूहळू दुरावल्या. नेमकं काय होतं हे प्रकरण, याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.
काय आहे नेमकं प्रकरण ?
चित्रपटसृष्टीला बळ देण्यासाठी स्वतः राजाराम महाराजांनी कोल्हापूरात सिनेटोनची निर्मिती केली. पुढे जाऊन हाच स्टुडिओ भालजी पेंढारकर यांनी विकत घेतला आणि त्याचे जयप्रभा स्टुडिओ असे नामकरण करण्यात आले. या स्टुडिओमध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले. शिवाय अनेक दिग्गज अभिनेते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले. सर्वकाही ठीक सुरू होते. मात्र अचानक महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर समाजात सुरू असलेल्या दंगलीमध्ये काहींनी स्टुडिओला आग लावली. यामध्ये स्टुडिओचे मोठ्या प्रमाणात निकसान झाले. यातून कसे बसे भालजींनी स्टुडिओ पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर डोक्यावर प्रचंड कर्ज झाले. पुढे काय करायचे हा विचार सुरू असताना त्यांनी नंतर लता मंगेशकर यांना हा विकून चित्रपट निर्मितीसाठीच हा वापरावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. लता मंगेशकर सुद्धा तयार झाल्या आणि त्यांनी त्या काळी 60 हजारांमध्ये हा स्टुडिओ त्यांच्याकडून विकत घेतला. तब्बल 13 एकर परिसरात हा स्टुडिओ पसरलेला होता. मात्र नंतर भालजी पेंढारकर यांचे निधन झाले आणि चित्रपट निर्मितीला ब्रेक लागला. हळूहळू याकडे दुर्लक्ष होऊ लागले. पुढे जाऊन लता मंगेशकर यांनी स्टुडिओ मधील मुख्य इमारत आणि काही परिसर तसाच ठेऊन साडे नऊ एकर जागा विकासकाला दिली. त्याठिकाणी आता मोठं मोठ्या इमारती उभ्या आहेत. मात्र त्यातील उरलेली साडे 3 एकर जागा तशीच होती. पुढे कोल्हापूर महानगरपालिकेने जिल्ह्यातील अनेक जागा, वास्तू हेरिटेज वास्तूमध्ये नोंद केल्या. यामध्ये जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा सुद्धा समावेश होता. लता मंगेशकर या निर्णयाविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या. मात्र लता मंगेशकर यांच्या या भूमिकेनंतर संतापलेल्या कोल्हापूरकरांनी मात्र मोठं आंदोलन पुकारले. शिवाय जिथे चित्रपटांचा पाया रचला गेला. त्या जागेची पुढे जाऊन विक्रीच होणार. त्यामुळे ही जागा अशीच राहावी अशी विनंती सुद्धा केली. यासाठी चित्रपट महामंडळाने सुद्धा महापालिकेला साथ दिली होती. शेवटी 2017 साली लता मंगेशकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली आणि हा वाद मिटला.
कोल्हापूरातील पन्हाळा येथील बंगल्यावर अनेकवेळा यायच्या -
कोल्हापूर आणि लता मंगेशकर यांचे एक वेगळे नाते आहे. जयप्रभा स्टुडिओ सोबतच त्यांनी येथील पन्हाळा गडावर असलेला बंगला विकत घेतला होता. आजही पन्हाळा येथे त्यांचा बंगला असून अनेकवेळा त्या इथे येऊन वास्तव्य करून गेल्या आहेत. त्यांच्या आवडत्या ठिकाणांपैकी ते एक ठिकाण आहे. स्वच्छ हवा आणि इथला परिसर त्यांना खूप आवडायचा. त्या येथे कधी राहायला यायच्या आणि जायच्या ते सुद्धा अनेकदा माहिती व्हायचे नाही. मात्र अनेकवेळा त्यांनी येथे वास्तव्य केले असून वर्षातून एक-दोन वेळा कामातून वेळ काढून त्या यायच्या. मात्र, त्या आता पुन्हा कधीच त्यांच्या आवडत्या बंगल्यावर परत येणार नाहीत, याची अनेकजण खंत व्यक्त करत आहेत.