कोल्हापूर - कोल्हापूरकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर-हैदराबाद-बंगळुरू यशस्वी विमानसेवेनंतर येत्या १२ मे'पासून कोल्हापूर-तिरुपती विमानसेवासुद्धा सुरू होणार आहे. तसेच कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावरसुद्धा आणखी एक विमानसेवा सुरू होणार आहे. या मार्गावरील विमानसेवेचे बुकिंगसुद्धा सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर-तिरूपती विमान सेवेमुळे भाविकांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे आता एका दिवसात तिरूपती बालाजीचे दर्शन घेऊन परत येता येणार आहे.
केंद्र शासनाच्या उडान फेज - ३ अंतर्गत कोल्हापूर-तिरुपती आणि कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावरील सेवेसाठी इंडिगो एअर लाईन्स या कंपनीला परवानगी मिळाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली ही विमानसेवा आता १२ मे'पासून प्रत्यक्ष सुरू होणार आहे. कोल्हापुरातून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे याचा फायदा नक्कीच या विमानसेवेला होणार आहे. शिवाय, कोल्हापुरातून तिरुपतीला दररोज रेल्वे सेवासुद्धा आहे. कोल्हापूर-तिरुपती प्रवासासाठी केवळ २९९९ रुपये तिकीट असणार आहे तर केवळ १ तास ५५ मिनिटांचा हा प्रवास असणार आहे.
रेल्वेच्या तिकीट दरातच जर प्रवाशांना विमानाने जाता येत असेल तर प्रवासी नक्कीच विमानसेवेला प्राधान्य देणार आहेत. ऑनलाईन आणि विमानतळावरील कंपनीच्या काऊंटरवर याचे तिकीट उपलब्ध झाले आहे. ही सेवा दररोज दिली जाणार असून, कोल्हापूरातून तिरूपतीसाठी सकाळी ९.४५ वाजता विमान टेकऑफ करेल. तर तिरूपतीहून कोल्हापूरसाठी विमान दुपारी १२ वाजता उड्डान करणार आहे. हे ७२ आसनांची क्षमता असणारे एटीआर विमान असणार आहे. यानिमित्ताने भाविकांची जुनी मागणी पूर्ण होणार आहे.