कोल्हापूर - आजपासून संपूर्ण राज्यात पुढील १५ दिवस संचारबंदी लागू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सुद्धा नियमावली जाहीर करण्यात आली असून कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरू नये, शिवाय ज्यांना परवानगी नाहीये त्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवावेत. घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाईसह वेळप्रसंगी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिला आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दररोज 80 टक्के पोलीस असणार रस्त्यावर -
संचारबंदीच्या काळात एकूण पोलीस दलापैकी 80 टक्के पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तासाठी रस्त्यावर असणार आहेत. एकूण दोन शिफ्टमध्ये बंदोबस्त असणार असून एका शिफ्टमध्ये १ हजार २०० पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तासाठी असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. जे नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडत असतील त्यांनी मास्क घातला आहे की नाही याची सुद्धा तपासणी करण्यात येणार आहे. विनामास्क कोणी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी साथ द्या -
इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात काही प्रमाणात दिलासादायक चित्र आहे. मात्र, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे. नियमानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच अस्थापना बंद राहणार आहेत. त्या उघडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर महापालिका, नगरपालिका आणि गावातील महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. बलकवडे यांनी दिली. शिवाय विनाकारण फिरणाऱ्यांवर मोटार व्हेईकल अॅक्टनुसार कारवाई होईल. 500 रुपये दंड आणि गाडी सुद्धा जप्त करण्यात येईल, असा इशारा सुद्धा त्यांनी दिली.