कोल्हापूर - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे कोल्हापुरात पडसाद उमटले आहेत. कोल्हापुरातील शिवसैनिकांनी पायतान मारो आंदोलन करत रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला पायताणाने चोप दिला. दानवे यांच्यावर आम्ही उपचार करू, असा टोलाही शिवसैनिकांनी लगावला आहे.
दिल्लीमधील आंदोलनाला पाकिस्तान व चीनमधून पाठिंबा असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केले. देशात वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीच्याविरोधातही निदर्शने यावेळी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
संबंधित बातमी वाचा-दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचा दावा
शेतकरी आपला अन्नदाता आहे, विसरू नका!-
रावसाहेब दानवे नेहमीच शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आले आहेत. आतासुद्धा त्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांबद्दल चुकीचे वक्तव्य केले. त्याचा आम्ही शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करत असल्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी म्हटले. यापुढे, जर अशा पद्धतीने वक्तव्य केली तर, चांगला धडा शिकवू असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा-रावसाहेबांना कंसासारखा अहंकार; जावयाचा सासऱ्यावर निशाणा
महागाईच्या विरोधातही शिवसेनेचे निदर्शने -
निवडणुकांमध्ये उद्योजकांकडून पैसे घेतले होते. ते पैसे कसे परत करायचे म्हणून देशातील जनतेकडून महागाईच्या माध्यमातून वसूल करण्याचे पाप हे केंद्र सरकार करत आहे. शेतकरी ते नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे भाजप सरकारला खाली खेचणे गरजेचे असल्याचेही जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी म्हटले.
राज्यभरातून दानवेंच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध-
रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. दावने यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंचा गर्व हा कंसासारखा असल्याची टीका केली आहे. रावसाहेब दानवे यांची जीभ कापून आणणाऱ्याला चारचाकी वाहन आणि दहा लाख रुपयांचे बक्षीस यवतमाळ शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आहे.