कोल्हापूर - कोल्हापुरातील नाभिक समाज आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नाभिक समाजाने केला आहे. लॉकडाऊन काळात आम्हाला देखील पॅकेज जाहीर करा, त्यावर दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा नाभिक समाज रस्त्यावर उतरणार, असा इशारा महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला.
हेही वाचा - मंगळवारीही कोल्हापुरात पावसाची हजेरी; पिकांचे मोठे नुकसान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधत राज्यात १४४ कलम लागू करत संचारबंदीची घोषणा केली. ही घोषणा करत असताना सर्वसामान्य जनता, असंघटित कामगार यांचा विचार करून जवळपास साडेपाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. हे पॅकेज जाहीर करताना नाभिक समाजाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नाभिक समाजाने केला आहे.
लॉकडाऊन करताना सर्वात आधी आमची दुकाने बंद केली जातात. शिवाय लॉकडाऊन उठवल्यानंतर सर्वात शेवटी आमचा विचार केला जातो. आमची दुकाने बंद ठेवल्यावर आमचा व मुलाबाळांचा उदरनिर्वाह कसा करायचा. पॅकेज जाहीर करत असताना नाभिक समाजाला कोणतीच मदत केली नाही. त्यामुळे, राज्यातील नाभिक समाज संतप्त झाला आहे. येत्या दोन दिवसांत नाभिक समाजाला पॅकेज जाहीर करावे, अन्यथा नाभिक समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला.
हेही वाचा - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कागलमध्ये अनोखा गृहप्रवेश, घरकुल लाभार्थ्यांनी मुश्रीफ यांचे मानले आभार