कोल्हापूर Kolhapur Murder News : पैसे देवाण-घेवाणीतून कोल्हापूर जिल्ह्यातील दोनवडे इथं शनिवारी रात्री लॉज मालकावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून करण्यात आलाय. 50 वर्षीय चंद्रकांत आबाजी पाटील असं खून झालेल्याचं नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन शामराव जाधव आणि दत्तात्रय कृष्णात पाटील हे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झालेत. गोळीबाराच्या या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडालीय.
मुलासमोर बापाचा खुन : करवीर तालुक्यातील दोनवडे येथील लॉजचालक चंद्रकांत पाटील यांच्याकडून रक्कम दामदुप्पट करुन देतो, असं आमिष दाखवून संशयित मारेकऱ्यांनी 5 लाख रुपये घेतले. मात्र, ते परत मागताच मारेकरी आणि पाटील यांच्यात मोठा वाद झाला. पैसे परत मागत असल्याचा राग अनावर झाल्यानं संशयित आरोपी दत्तात्रय पाटील व सचिन जाधव यांनी गावठी कट्ट्यानं पाटील यांच्यावर गोळी झाडत त्यांचा खून केलाय. वाद होतानाचा आवाज ऐकून चंद्रकांतचा मुलगा रितेश घटनास्थळी आला. एवढ्यात यातील एकानं चंद्रकांत यांच्यावर गोळी झाडली. डोळ्यादेखत वडिलांचा खून झाल्यानं रितेश भीतीनं गांगरुन गेला होता. त्याला बोलताही येत नव्हतं.
- पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल : दोनवडे इथं लॉज मालकाचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जयश्री जाधव, करवीर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, करवीर पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
"दोनवडे ता. करवीर इथं शनिवारी रात्री गावठी बंदुकीतील गोळी झाडून चंद्रकांत पाटील यांची दोन हल्लेखोरांनी हत्या केली आहे. दोघंही संशयित आरोपी करवीर पोलिसांत हजर झाले आहेत खून हा आर्थिक देवाणघेवाणीतून झाला असल्यानं या घटनेचे आणखी धागेदोरे मिळतात का याचा पोलीस तपास करत आहेत." - अरविंद काळे, पोलीस निरीक्षक, करवीर पोलीस
आठ तासात खुनी हल्ला आणि खुनाची घटना : कोल्हापूर सदर बाजार परिसरात किरकोळ वादातून शनिवारी दुपारी बाराच्या दरम्यान मेहमूदखान तोताखान पठाण यांच्यावर तलवारीनं प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर अवघ्या आठ तासातच करवीर तालुक्यातील दोनवडे इथं खुनाचा प्रकार घडल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात दहशतीचं वातावरण पसरलंय. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं मात्र अनेक ठिकाणी आर्थिक वादातून होत असलेल्या खुनी हल्ल्यामुळं कायदा व सुव्यवस्थेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण होतंय.
हेही वाचा :