कोल्हापूर - लग्न म्हंटलं की, उखाणा हा आलाच. कोल्हापुरातील एका नवरदेवाने घेतलेला उखाणा चांगलाच चर्चेत आला आहे. नवरदेव महावितरण कंपनीमध्ये नोकरी करतो. सध्या वीजबिलाचा प्रश्न चर्चेत आहे. याचाच धागा पकडत त्यांनी नागरिकांना आवाहन करणारा असा उखाणा घेतला आहे.
करवीर तालुक्यातील चाफोडी गावातील मंगेश कांबळे यांचा 21 फेब्रुवारीला विवाहसोहळा पार पडला. मुरगुडमधील संध्या यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मंगेश हे कोल्हापुरातल्या शेंडा पार्क येथील शाखा कार्यालयात सिनियर टेक्निशियन म्हणून नोकरी करतात. त्यांनी महावितरण कंपनीवर असलेली निष्ठा उखाण्यामधून दाखवून दिली आहे. सर्वांना लाईटचे बिल भरण्याची विनंती या उखाण्यातून केली आहे. "आयुष्यभर साथ देतो तोच जोडीदार खरा... संध्याचे नाव घेतो सर्वांनी लाईटचं बिल भरा..!" असा उखाणा त्यांनी आपल्या मित्रांच्या आग्रहाखातर घेतला. त्यांचा हा उखाणा व्हायरल झाला आहे.
मंत्री प्राजक्त तनपुरेंनी उखाण्याचा व्हिडिओ केला ट्विट -
मंगेश कांबळे यांच्या उखाण्याचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीसुद्धा त्याची दखल घेतली. त्यांनी आपल्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विट केला आहे. शिवाय 'याला म्हणतात कर्तव्यदक्ष कर्मचारी' असे म्हणत मंगेश कांबळे यांचे कौतुकही केले.