कोल्हापूर - जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला सात दिवसांचा कडक लॉकडाऊन शिथिल केला जात असून उद्यापासून राज्य सरकारच्या नियमानुसार लॉकडाऊन असेल, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल होत असला तरी रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. दरम्यान, येत्या काळात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने त्यांच्या उपचारासाठी जिल्ह्यात विशेष उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - कोल्हापूरकरांना दिलासा.. रविवारपासून कडक लॉकडाऊन शिथील, वाचा काय सुरू अन् काय राहणार बंद
नागरिकांनी नियमांचे पालन करावे - पालकमंत्री
तीसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरू शकते, या संभाव्य पार्श्वभूमीवर आज राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनासोबत, टास्क फोर्ससोबत ऑनलाईन बैठक झाली. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी अजूनही रुग्ण वाढ थांबलेली नाही. त्यामुळे, नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
तीसऱ्या लाटेची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन तयारीचे आदेश
तीसऱ्या लाटेची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाला तयारी करण्याचे आदेश टास्क फोर्सने दिले आहेत. त्यासाठी लागणारी आरोग्य यंत्रणा, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड यांची स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात जवळपास 18 वर्षांखालील मुलांची संख्या 10 लाख इतकी आहे. जिल्हा प्रशासन यांचे वर्गीकरण करून माहिती घेणार आहे. तसेच, येत्या बुधवारी त्याबाबत पुन्हा बैठक होणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - कोल्हापूर : 'कोरोनाबाधित रुग्ण उपचारांसाठी उशिर करत असल्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूदर वाढला'