कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाविरोधात लढाई लढत आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, पोलीस, फ्रंटलाईन वर्कर, प्रशासन यांच्यासोबत नागरिक, स्वयंसेवी संस्था, युवा पिढीसुद्धा आपल्या जिवाची पर्वा न करता या संकटाला सामोरे जाण्यासाठी समाजाला मदत करत आहे. या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शहरातील विविध ठिकाणी होर्डिंग लावून त्यांचे कौतुक केले आहे. पालकमंत्र्यांच्या कौतुकामुळे या कोरोना योद्ध्यांना काम करण्यास अधिक बळ मिळणार आहे.
कोरोना लढ्यात आपला वाटा उचलणाऱ्या सर्वांना सलाम - सतेज पाटील
पालकमंत्री सतेज पाटील कोरोना योद्ध्यांचे कौतुक करताना म्हणाले, की 'कोल्हापूरकर जवळपास 15 महिने कोरोना संकटाशी लढत आहेत. डॉक्टर, नर्स, पोलीस, फ्रंटलाईन वर्कर, प्रशासन या संकटाचा मुकाबला करत आहेत. पण यांच्या सोबतीने कोल्हापुरातील काही सामान्य नागरिक, स्वयंसेवी संस्था, सर्वपक्षीय कार्यकर्ते, युवा पिढीसुद्धा आपल्या जिवाची पर्वा न करता या संकटाला सामोरे जाण्यासाठी समाजाला मदत करत आहे. पडद्यामागे राहणारे हे जनसामान्य या संकटकाळातील खरे हिरो आहेत. कोरोना विरुद्धची लढाई सुरू राहीलच. पण या सगळ्या कोल्हापूरकरांना सलाम करायलाच हवा. आपल्या आजूबाजूलाही पडद्यामागे असे राबणारे हात असतील तर त्यांचेही कौतुक करा. शिवाय आपल्या सर्वांनी केलेल्या कौतुकामुळे त्यांना अधिक चांगले काम करण्यासाठी एक मोठे बळ मिळेल'.
होर्डिगवर झळकले हे कोरोना योद्धे -
जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून व्हाईट आर्मीच्या माध्यमातून सेवा देत असलेल्या अशोक रोकडे आणि त्यांच्या टीमचेही सतेज पाटील यांनी कौतुक करत होर्डिंग लावले. त्याचबरोबर सेवा निलयम फाऊंडेशनच्या ऐश्वर्या मुनीश्वर, सेवावृत प्रतिष्ठानचे संभाजी साळुंखे, द नेशन फर्स्टचे अवधूत भाट्ये यांच्याबरोबरच सीपीआर रुग्णालयात नाश्ता देत असलेल्या चार मुलींच्या ड्रीम टीमसह नुकतेच रुग्णवाहिकेच्या चालक बनलेल्या प्रिया पाटील यांचेही पालकमंत्र्यांनी कौतुक केले आहे.
हेही वाचा - ...तर देशात किंवा राज्यात पुन्हा लॉकडाऊन करून चालणार नाही - पोपटराव पवार