मुंबई- कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त कोल्हापूर भागाचा दौरा केला नसल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मात्र, विरोधकांनी पुराचे राजकारण करू नये, येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. त्यावेळी राजकारणाचे पाहू, पण सध्या स्थिती गंभीर असल्याने यातून सर्वजण मिळून मार्ग काढू, असे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, की कोल्हापूरला जाणारे रस्ते बंद आहेत, लष्कराच्या विमानालाही मंगळवारी कोल्हापूर परिसरात पोहोचता आले नाही. पण सातारा आणि पुणे जिल्ह्यातून मी पूरग्रस्त भागात देण्यात येणाऱ्या मदतीच आढावा घेत आहे. लष्कराच्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर परिसराचा दौरा करणार आहेत. मात्र, लष्कराचे नियम अतिशय कठीण असल्याने मंत्री असलो तरी त्या विमानातून मला प्रवास करता येणार नाही. मुख्यमंत्री यासाठी प्रयत्न करत आहेत.
सध्याची स्थिती ही आरोप प्रत्यारोप करण्याची नाही, पुरात अडकलेल्या लोकांना मदत पोहोचवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. लष्कराची काही पथके कोल्हापूर परिसरात दाखल झाली आहेत. पुरग्रस्तांनाच्या मदतीसाठी एनडीआरएफ तैनात आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना आवश्यक मदत देण्यात येत आहे. त्यांना अन्न पाणी आणि दुधाची व्यवस्था करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
पाण्याचा विसर्ग केला नाही तर, धरणं फुटण्याची भीती
सध्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या भागातल्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर अनेक नद्यांना पूर आला आहे. धरणेही ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. जर विसर्ग केला नाही तर धरणे फुटण्याची भीती आहे, असेही पाटील यांनी सांगितले. निसर्गाचा असाही अनुभव आपल्याला सहन करावा लागत आहे. पण, यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रशासन करत आहे. आता विरोधकांनी याचे राजकारण करू नये, असे आवाहनही पाटील यांनी केले.