कोल्हापूर - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी गर्दीच्या ठिकाणी गेल्यास सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. कोल्हापूर प्रशासनानेसुद्धा नागरिकांनी खरेदीसाठी गेल्यानंतर एकमेकांमध्ये किमान 3 फूट अंतर ठेवण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही तर रात्रंदिवस मेहनत घेत संपूर्ण शहरात सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर किराणा दुकान आणि ठरवून दिलेल्या भाजी विक्रेत्यांच्या स्टॉलसमोर बॉक्स मार्क केले आहेत. पण मार्क केलेल्या बॉक्समध्ये उभे राहून एकही व्यक्ती खरेदी करत नसल्याचे चित्र सद्या काही ठिकाणी पाहायला मिळत आहे.
अनेक उपाययोजना करूनसुद्धा कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे लोक एकाच ठिकाणी गर्दी करत आहेत. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. शिवाय लोकांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणीही सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, नागरिक प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.