कोल्हापूर - कोरोना रुग्णांच्या उपचाराची अवाजवी बील आकारणी करुन पिळवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई केली जाणार असून प्रसंगी नोंदणीही रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महापालिक आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यावेळी म्हणाले, की जिल्ह्यामध्ये कोविड-19 प्रादूर्भाव वाढत आहे. दररोज 250 ते 350 रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडे कलही वाढत आहे. शहरातील 25 खासगी रुग्णालये सेवा देत आहेत. परंतु, काही रुग्णालयांकडून रुग्णांसाठी अवाजवी बील आकारणी केली जात आहे. अशावेळी या रुग्णांची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकास्तरावर प्रत्येक रुग्णालयासाठी लेखा परीक्षण अधिकारी नेमण्यात आला आहे. रुग्णांना दिलेले बील हे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार आहे की नाही, हे हा अधिकारी तपासणी करेल. योग्य बील असल्यास तेवढेच बील रुग्णालयाला द्यावे. उर्वरित बील रुग्णांनी देवू नये.
पुढे ते म्हणाले, की रुग्णांनी त्यासाठी या लेखा परीक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क करुन तक्रार करावी. अवाजवी बील आकारणी केल्याचे आढळल्यास अशा रुग्णालयांवर निश्चित कारवाई केली जाईल. रुग्णालयाची नोंदणी देखील रद्द केली जाईल, याची सर्व खासगी रुग्णालयांनी नोंद घ्यावी. अशीच कार्यपद्धती ग्रामीण भागात जिथे मोठी रुग्णालये आहेत, इचलकरंजी, गडहिंग्लज, जयसिंगपूर, शिरोळ या ठिकाणीही खासगी रुग्णालये अवाजवी दर आकारणी करत असतील तर तेथेही लेखा परीक्षण अधिकाऱ्यांची स्वतंत्र नेमणूक करुन या बिलांवर नियंत्रण ठेवले जाईल असेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हटले.