कोल्हापूर- लग्नसमारंभात कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या मंगल कार्यालयांना महापालिकेच्या अग्निशमन दलाने चांगलाच दणका दिला आहे. सामाजिक अंतर न पाळने, ५० व्यक्तींची मर्यादा ओलांडणे, सॅनिटायझर नसणे अशा नियमांचे उल्लंघन केल्याने जवळपास 27 मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून साडेतीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोल्हापूर महापालिकेने पुन्हा एकदा कारवाईला सुरवात केली आहे. यासाठी महापालिकेने पथके तयार केली असून, आज अग्निशमन विभागाने मंगल कार्यालयांवर धाडी टाकल्या, यावेळी मंगल कार्यालय चालकांची व आयोजकांची चांगलीच धावपळ उडाली. नियमांचे पालन न करणाऱ्या 27 मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. यावेळी शहरातील फुलेवाडी, आपटेनगर, कळंबा, सानेगुरुजी, क्रशर चौक, नाळे कॉलनी, बेलबाग कसबा बावडा, ताराबाई पार्क कावळा नाका, रेल्वे गुड्स परिसर या ठिकाणी असलेल्या विविध मंगल कार्यालयावर छापे टाकण्यात आले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य अग्निशमन अधिकारी रंणजित चिले, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, स्थानक अधिकारी रणजित भिसे या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात आली.
नियम पाळण्याचे आवाहन
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कार्यक्रम आयोजन करण्याऱ्या संस्थांनी, मंगल कार्यालयांनी कोरोनाबाबत शासनाने ठरवून दिलेले नियम पाळले पाहिजे, योग्य ते सामाजिक अंतर ठेवावे, व्यक्तींची मर्यादा ओलांडू नये, सॅनिटायझर मशिनची व्यवस्था करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
या प्रमुख कार्यालयांवर झाली कारवाई
1. ज्ञानदीप मंगल कार्यालय कसबा बावडा - एक हजार रु.
2. धैर्य प्रसाद हॉल ताराबाई पार्क - दोन हजार रु.
3. विश्वेश्वरय्या हॉल ताराबाई पार्क - एक हजार रु.
4 .मांगल्य हॉल ताराबाई पार्क - दोन हजार रु.
5 .ज्योतिबा' हॉल मार्केट यार्ड - एक हजार रु.
6. महाराजा हॉल उसगाव रोड - दोन हजार रु.
7. शुभारंभ हॉल उजगाव रोड - दोन हजार रु.
8. रामकृष्ण रामकृष्ण हॉल - दोन हजार रु.
9 .महालक्ष्मी हॉल कावळा नाका - दोन हजार रु.
10 .वृंदावन हॉल कावळा नाका - दोन हजार रु.
11. सैनिक दरबार सैनिक दरबार हॉल - तीन हजार रु.
12 .विश्व शौर्य हॉल - एक हजार रु.