मुंबई : विधानसभा निवडणूक प्रचारामुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. सोमवारी (18 नोव्हेंबर) रोजी प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. तर 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. दरम्यान, आज प्रचाराचा सुपर संडे ठरला. कारण आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं उमेदवार जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते.
कलिना मतदारसंघात दुहेरी लढत : मुंबईतील कलिना विधानसभा मतदारसंघ हा चर्चेचा मतदारसंघ म्हणून पाहिला जातो. इथे ठाकरे गटाचे संजय पोतनीस हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महायुतीत आरपीआयने पाच जागांची मागणी केली होती. मात्र, त्यांना केवळ दोन जागा देण्यात आल्या. दोन जागामधील कलिना विधानसभा मतदारसंघातून आरपीआयचे अमरजीत सिंग हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळं येथे महाविकास आघाडीचे संजय पोतनीस विरुद्ध महायुतीचे अमरजीत सिंग यांच्यात दुहेरी लढत होणार आहे. दरम्यान, "मी तळागाळातील कार्यकर्ता आहे. ग्राउंड लेव्हलवर जाऊन लोकांच्या समस्या सोडवतो, त्यामुळं मला विजयाची शंभर टक्के हमी" असल्याची प्रतिक्रिया, शिवसेना (उबाठा गटाचे) उमेदवार संजय पोतनीस यांनी "ईटीव्ही भारत"ला दिली.
प्रचार हायटेक नसतो : पुढे बोलताना संजय पोतनीस म्हणाले की, "प्रचार म्हटलं की मोठमोठे सेलिब्रिटी, दिग्गज व्यक्ती असतात. पण माझा प्रचार साधा आणि सरळ असतो. मी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करतो. चौकसभा घेतो आणि तिथे मी थेट मतदारांशी बोलतो. मी साधा कार्यकर्ता आहे. तळागाळात जाऊन मतदारांच्या ज्या समस्या आहेत. त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. मागील दहा वर्षापासून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. त्यामुळं मतदार संघातील समस्यांची मला चांगलीच जाण आहे. तसेच अजून कोणते मुद्दे बाकी आहेत. हे देखील मला चांगलं माहित आहे. दरम्यान, मी एकूण सहा निवडणुका लढवल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेतील चार निवडणुका लढवल्या आहेत. चार वेळा मला नगरसेवक म्हणून मतदारांनी कौल दिलाय. आताही दहा वर्षापासून मी आमदार म्हणून काम करत आहे. आमदार म्हणून लोकांच्या अधिकाधिक समस्या आणि त्यांचे प्रश्न सोडविण्याचा माझा कल असतो. कारण मी लोकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करतो. थेट मतदारांशी संवाद साधतो. त्यामुळं याही वेळेला मतदार माझ्या बाजूनी कौल देतील".
लोकांच्या कामाचाच प्रचार : मी लोकांच्या ज्या समस्या प्रश्न आहेत त्यापासूनच मी प्रचाराला सुरुवात करतो. लोकांचे प्रश्न आणि समस्या याला मी नेहमी प्राधान्य देत आलो आहे. म्हणून मला लोकांनी चार वेळा नगरसेवक निवडून दिलं आहे. सुरुवातीला नगरसेवक आणि नंतर आमदार म्हणून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. पाण्याचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, शौचालय, आरोग्य हे जनतेचे निगडित आणि मूलभूत प्रश्न मी सोडवण्याचा पुरेपूर 100 टक्के प्रयत्न केला. दरम्यान, मतदारसंघातील काही प्रश्न बाकी असतील, असं काही जर मतदारांना वाटत असेल तर थेट त्यांनी मला येऊन भेटावं, माझ्याशी संपर्क साधल्यावर नक्कीच त्यांचे प्रश्न सोडविण्यावर मी भर देईन. विकासकामं झालेली नाहीत अशी टिका विरोधक करत आहेत. पण विरोधकांचं टीका करण्याचं कामच आहे, असं संजय पोतनीस म्हणाले.
झोपडपट्टी स्थलांतरासाठी प्रयत्न केले : आपण याच्या आधी 10 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहात. त्यामुळं आता कोणते प्रश्न मतदारसंघातील बाकी आहेत? असा प्रश्न संजय पोतनीसांना विचारला असता, विमानतळ प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या झोपडपट्या म्हणजे वाकोला, कलिना येथे झोपडपट्टीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. या झोपडपट्टी वस्तीतील पाणी प्रश्न, शौचालय, आरोग्य हे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. तिथपर्यंत पोहोचता न आल्यानं हे प्रश्न सोडविता आले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. कारण हा झोपडपट्टी परीसर अतिशय दाटीवाटीनं विस्तारलेला आहे. तसेच या झोपडपट्टीचे स्थलांतरित व्हावं, यासाठी मी सरकारसोबत अनेक बैठका घेऊन पाठपुरावा केला. आता अजूनही पाठपुरावा सुरू आहे. मुख्य म्हणजे या झोपडपट्टी स्थलांतरित करतेवेळी झोपडपट्टीतील पात्रता निश्चित करणे. या झोपडपट्टीचे पुनर्वसन व्हावं, त्यांचं चांगल्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं संजय पोतनीस म्हणाले.
हेही वाचा -