कोल्हापूर - खराब हवामानामुळे कोल्हापूरची कन्या कस्तुरीला ‘मिशन एव्हरेस्ट मोहीम’ रद्द करावी लागली आहे. पूरक वातावरण असताना चढाईला सुरुवात केली होती. मात्र, यास चक्रीवादळाच्या प्रभावामुळे एव्हरेस्टवरील हवामानात मोठा बदल झाला होता. त्यामुळे शेवटी ही मोहिम अंतिम चढाई तिथेच थांबवून रद्द करावी लागली आहे. गेल्या 3 दिवसांपासून कस्तुरीसह अन्य गिर्यारोहक अनुकूल वातावरणाच्या प्रतीक्षेत होते. मात्र वातावरणात कोणतीही सुधारणा होत नसल्याने मोहिम रद्द करण्यात आली आहे.
अंतिम चढाई असताना खराब हवामानामुळे मोहीम रद्द -
कस्तुरी सावेकर हिचे वडील दीपक सावेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एव्हरेस्टवरील अंतिम चढाई सुरू असताना प्रचंड बर्फवृष्टी, पाऊस तसेच प्रचंड वारा सुरू झाल्याने कस्तुरीला कॅम्प 2 वर परत यावे लागले होते. गेल्या 3 दिवसांपासून अनुकूल वातावरणाची सर्वजण प्रतीक्षा करत होते. मात्र तेथील परिस्थिती फारच बिकट बनली होती. 50 फूटाच्या पुढचे काहीही दिसत नव्हते. तर सर्वांचेच टेन्ट आणि कपडेही ओले झाले होते. कपडे वाळण्यासाठी कोणताही पर्याय नव्हता. खाण्याचे साहित्य सुद्धा संपत आले होते. बर्फवृष्टीमुळे बेसकॅम्पवरून खाण्याचे साहित्य वर येऊ शकत नाहीये, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वजण वेदर विंडो मिळेल अशी आशा बाळगून हिंमत न हारता चढाईची वाट पहात होते. कस्तुरीही मोठ्या जिद्दीने खराब हवामानालाही तोंड देत त्याठिकाणी तळ ठोकून होती. मात्र खराब हवामानामुळे सर्वांनाच मोहीम रद्द करावी लागली आहे.