कागल(कोल्हापूर) - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमैय्या यांनी केलेले आरोप म्हणजे घाणेरडे राजकारण आणि निव्वळ स्टंटबाजी आहे. हिंमत असेल तर किरीट सोमैय्या यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान कागलमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले आहे. आज कागलमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली. किरीट सोमैय्या सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि मुश्रीफ समर्थक कागलमध्ये जमणार आहेत. आम्हाला भेटूनच सोमैय्या यांनी पुढे जावे, असे आव्हान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आले आहे.
- कागलमधून कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊनच सोमैय्या यांनी पुढे जावे -
पत्रकार परिषदेत मुश्रीफ समर्थक आणि केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, सोमैय्या यांनी जे -जे प्रश्न उपस्थित केलेत त्या सर्व प्रश्नांची माहिती सविस्तर देऊ, असे निवेदन मंत्री मुश्रीफ यांनी केले होते. असे असतानाही कोल्हापूर दौरा, कागल आणि कारखाना ही स्टंटबाजी कशासाठी? सोमवारी 20 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आम्ही हजारो कार्यकर्ते जमणार आहोत. आमच्या प्रश्नांची उत्तरे देऊनच सोमैय्यांनी पुढे जावे, असेही त्यांनी सांगितले आहे.
- आमचे स्वागत स्विकारुनच जा -
यावेळी सर्वच कार्यकर्त्यांनी किरीट सोमैय्या यांनी केलेल्या आरोपांवर निषेध व्यक्त केला. किरीट सोमैय्या यांच्या या षड्यंत्रात चंद्रकांत पाटीलही पडद्याआडून सामील आहेत. या दोघांनीही कागलच्या जनतेचे स्वागत स्वीकरुनच मग पुढे जावे, असे उपरोधिक आवाहनही यावेळी कार्यकर्त्यांनी केले.
हेही वाचा - वसुलीप्रमाणे ठाकरे सरकारची मानहानीची नोटीसही १०० कोटींचीच, किरीट सोमैयांची खोचक टीका