कोल्हापूर - आज सकाळपासून जयंती नाल्यावर ( Jayanti Drain ) असलेल्या महापालिकेच्या बंधाऱ्यातून अतिशय काळेकुट्ट आणि प्रक्रिया न केलेले पाणी थेट पंचगंगा नदीत ( Panchganga River ) मिसळत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंचगंगा नदी प्रदूषणाचा ( Panchganga River Pollution ) प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिकांची मागणी -
शहरातील सहा नाल्यातील प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत थेट मिसळत आहे तर अनेक कारखान्याचे केमिकल युक्त पाणीही प्रक्रिया न करता पंचगंगेत मिसळत असल्याने प्रदूषणात भर पडत आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत. संबंधितांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राजाराम बंधारा येते मृत मासे मिळून आले होते त्यामुळे अशा पद्धतीने प्रक्रिया न केलेले पाणी पंचगंगेत सोडणे तात्काळ थांबवा, अशी मागणी होऊ लागली आहे.
कोल्हापूरची पंचगंगा नदी अक्षरशहा गटारगंगा झाली आहे. याचं कारण ही काही वेगळे नाही. दररोज हजारो लिटर मैला मिश्रित सांडपाणी आणि नाल्यातून पाण्याच्या प्रवाहा सोबत वाहून आलेला प्लास्टिक कचरा थेट प्रक्रियावीनाच पंचगंगा नदीत मिसळत आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नुसता नागरिकांच्या आरोग्याला धोका नाही तर जलचर प्राण्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी प्रदूषणामुळे लाखो मासे हे पंचगंगा नदीत मृत झाल्याची घटना समोर आली होती. मात्र, तरीदेखील पंचगंगा प्रदूषण नियंत्रण महामंडळ कोणतीही कारवाई न करता फक्त कागदी घोडे नाचविण्याचं करत आहे.
त्यातच भरीत भर म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प येथे एकूण 4 पंप आहेत. यातील काही पंप बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि हे पंप दुरुस्त न केल्याने आज हे दूषित प्रक्रिया न केलेले पाणी ओव्हरफ्लो होऊन थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. यामध्ये प्लास्टिकदेखील थेट वाहून जात नदीत मिसळत आहे यामुळे सामाजिक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यापूर्वीच माहिती अधिकार कार्यकर्ते दिलीप देसाई यांच्या माध्यमातून अनेक वेळा प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले गेली. मात्र, कोल्हापूर महापालिकेचे प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ या दोघांनीही याकडे डोळेझाक केली आहे. याचाच परिणाम म्हणून आता दिलीप देसाई यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य कोल्हापूरकरांच्या आरोग्याच्या जीवाशी कोण खेळत असेल तर आम्ही कदापि शांत बसणार नाही, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.
हेही वाचा - Varsha Gaikwad on Students Agitation : सरकार चर्चेला तयार, विद्यार्थ्यांनी मोर्चे काढू नयेत - वर्षा गायकवाड
दूषित पाणी थेट नदीत मिसळत असल्याने दिलीप देसाई आक्रमक -
आज सकाळपासूनच नाल्यातील दूषित पाणी थेट नदीत मिसळत असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते दिलीप देसाई हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी व्हिडिओ जारी करत महापालिका आणि प्रदूषण मंडळाला धारेवर धरले. दरम्यान, तत्काळ संबधित प्रदूषण अधिकारी आणि महापालिका अधिकारी पंपिंग स्टेशन येथे दाखल झाले. यावेळी दिलीप देसाई यांनी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. पंप बंद अवस्थेत होते तर ते का वेळीच दुरुस्त करण्यात आले नाहीत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. दरम्यान, प्रदूषण अधिकारी यांनीही विनाप्रक्रिया मिसळत असलेल्याला जबाबदार कोण, असे विचारत संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.