पुणे - भारत हा कृषीप्रधान देश असून, आजही इथे मोठ्या प्रमाणावर पारंपरिक पद्धतीनं शेती केली जाते. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध संशोधन होताना आपल्याला पाहायला मिळते. राज्यात तर उसाची शेती ही मोठ्या प्रमाणावर होत असून, गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने ही उसाची शेती केली जाते. मात्र आता बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून देशातील पहिला प्रयोग करण्यात आलाय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसशेती करणं शक्य झालंय.
कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसशेती : बारामती येथे कृषी विज्ञान केंद्राच्या प्लॉटवर ‘कृषिक 2025’ कृषी प्रदर्शनात एआयच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या ऊसशेतीचं प्रयोग शेतकऱ्यांना दाखवण्यात येताहेत. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक हे या तंत्रज्ञानाची पाहणी करीत आहेत. बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी एआय या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसशेती विकसित केलीय. तब्बल एक हजार शेतकऱ्यांच्या शेतातील उसावर हा प्रयोग करण्यात आला असून, त्याचे चांगले आणि फायदेशीर असे परिणाम समोर आलेत.
शेतकऱ्यांच्या उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत होणार वाढ : शेतीमध्ये तसेच ऊस शेतीत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान तसेच विविध संशोधन समोर आलं असतानादेखील आजही अनेक लोक पारंपरिक पद्धतीनं शेती करतात आणि शेतीतील परिपूर्ण माहितीच्या अभावामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादनदेखील घटते. पण आता एआयच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या प्रयोगाने शेतकऱ्यांना उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत वाढ आणि उत्पादन खर्चात 20 ते 40 टक्क्यांची घट आणि 30 टक्के पाण्याची बचत होणार आहे.
एक हजार शेतकऱ्यांच्या शेतात करण्यात आला प्रयोग : याबाबत डॉ. भूषण गोसावी यांनी सांगितलं की, उसामध्ये आम्ही नवीन क्रांती केलीय. यात एआय या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उसाचं उत्पन्न हा एकरी 160 टनांपेक्षा कसा घेऊन जाऊ शकतो, याचं सादरीकरण करण्यात आलंय. या प्रयोगाला सुरुवात ही तीन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. फॉर्म ऑफ द फ्युचरच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पिकांमध्ये कशी क्रांती करू शकतो, पाण्याचा कमी वापर, तसेच खताचा कमी वापर आणि उत्पादनात कशी वाढ करू शकतो या उद्दशाने आम्ही संशोधनाला सुरुवात केलीय आणि मार्च 2024 पासून एक हजार शेतकऱ्यांच्या शेतीत हा प्रयोग सुरू केल्याचं यावेळी गोसावी यांनी सांगितलंय.
एआयच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळणार प्रत्येक अपडेट : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शेतीमधील माती, जमिनीची माहिती, खतांची माहिती, वातावरण बदलाची माहिती आणि नेमकी गरज काय आहे याची माहिती मिळणं शक्य झालंय. तसेच जमिनीत जो सेन्सर लावण्यात येतो, त्यातून जमिनीचा ओलावा, तापमान आणि बदल याची माहिती मिळते. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे सॅटेलाइटद्वारे मॉनिटरिंग केली जाते आणि याबाबत अलर्ट हे सातत्याने शेतकऱ्यांना दिलं जातं. ज्या एक हजार शेतकऱ्यांच्या शेतात हा प्रयोग करण्यात आलाय, त्या शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या 40 टक्के उत्पादनात वाढ होताना पाहायला मिळालीय, असंही यावेळी डॉ. भूषण गोसावी यांनी सांगितलंय.

एआयचा वापर केला तर होणार फायदे : ऊसशेतीमध्ये ‘एआय’ चा वापर केला तर यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत वाढ होईल. तसेच 30 ते 40 टक्के पाण्याची बचत होणार आहे आणि उत्पादन खर्चात 20 ते 40 टक्क्यांची घटदेखील होईल आणि जमीन सुपिकतेमध्ये वाढ होईल. सेंद्रिय कर्ब मूल्यमापनाद्वारे भविष्यात शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा फायदा मिळेल आणि कापणी कार्यक्षमतेत 35 टक्क्यांपर्यंत सुधारणा होताना पाहायला मिळेल आणि रासायनिक खतांच्या वापरात 25 टक्के घट तसेच सातत्याने पीक निरीक्षणामुळे कीटकनाशकांच्या वापरात 25 टक्के बचत, असे अनेक फायदे हे आपल्याला होताना पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा :