कोल्हापूर: कोल्हापुरातील राजारामपुरी येथे असलेली 'वेलोस टेक्निसाईट्स' ही कंपनी कोल्हापूरसह पुणे, दुबई आणि अमेरिकेतसुद्धा काम करत आहे. 2015 पासून ही कंपनी 'आयटी' आणि 'आयओटी' क्षेत्रात काम करत आहे. आजवर त्यांनी अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. 'वेलोस टेकिनसाईट्स' कंपनीचे बजाज, टीव्हीएस, महिंद्रा अँड महिंद्रा सह अनेक मोठमोठ्या कंपन्या ग्राहक आहेत. कोरोना काळात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला ज्या महापुराला सामोरे जावे लागते. कंपनीने त्याच समस्येवर काम करायचे ठरवले. त्यानुसार महापुराचा पूर्व इशारा, संभाव्य पावसानंतर पाण्याची वाढणारी पातळी, त्यामुळे बंद होणारे रस्ते याबाबत आधीच माहिती मिळेल, अशी सिस्टीम त्यांनी बनवली आहे.
भारतीय इंजिनिअर्सची कमाल: सध्या अमेरिकेत ही अत्याधुनिक संकल्पना राबवली जात आहे. भारतातसुद्धा याची सध्या गरज असल्याचे कंपनीचे सीईओ हर्षवर्धन साळुंखे यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात असलेल्या कंपनीच्या मुख्य शाखेमध्येच अनेक इंजिनिअर्सनी मिळून ही सिस्टीम साकारली आणि त्याचे अप्लिकेशन बनविण्यात त्यांना यश आले आहे. याच्या अनेक चाचण्यासुद्धा त्यांनी घेतल्या असून यात 80 टक्के अचूकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रशासनाकडेसुद्धा याबाबतच्या अनेक पद्धतीची माहिती मिळत आहे; मात्र 'रिअल टाईम डेटा' देणारी ही अत्याधुनिक यंत्रणा बसविण्याची गरज असल्याचे सीईओ साळुंखे यांनी सांगितले.
असे काम करेल 'सिस्टीम': 'वेलोस टेकिनसाईट्स' या कंपनीने बनविलेल्या 'फ्लड मॉनेटरिंग अँड अलर्ट सिस्टीम'मध्ये प्रत्येकाला 'रिअल टाईम डेटा' मिळणार आहे. शिवाय प्रशासनाला एक हमखास आणि खात्रिशीर माहिती पुरविली जाईल. ज्यामध्ये धरणातून सोडलेले पाणी, त्याचा वेग, होणारा पाऊस, सध्याची पाणी पातळी आणि त्यामुळे किती फूट पाणी वाढेल याची माहिती आधीच मिळू शकेल. एक-दोन तास नाही तर तब्बल 12 ते 72 तास आधी आपण याचा अंदाज देऊ शकतो, असेही साळुंखे यांनी म्हटले आहे. ही सिस्टिम AI, ML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सेन्सर आणि आयोटी अर्थात इंटरनेट ऑफथिम्स या संकल्पनेवर आधारित आहे.
'रीअल टाईम डेटा' मिळण्यास मदत: यासाठी प्रत्येक बंधाऱ्यावर 'आयओटी' संच लावला जाईल. तेथील पाण्याची सध्याची पातळी आणि वेग 'रीअल टाईम'वर घेतला जाईल. हवामान खात्याकडून प्राप्त इशाऱ्यांची देखील नोंद या सिस्टीममध्ये समाविष्ट केली जाईल. याशिवाय पाटबंधारे विभागाकडील सविस्तर डाटा एकत्र करून AI, ML च्या 'अल्गोरिदम'मधून पाण्याची संभाव्य पातळी, पूरस्थितीचा अंदाज लावता येणार आहे. सध्या अशी माहिती प्रशासनाकडून मिळते. परंतु, त्यामध्ये हमखास अशी आकडेवारी मिळत नाही. 'फ्लड मॉनेटरिंग अँड अलर्ट सिस्टीम'मुळे 'रीअल टाईम डेटा' मिळणार आहे. ही आकडेवारी अचूकसुद्धा असणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
'फ्लड मॉनेटरिंग अँड अलर्ट सिस्टीम'चे फायदे:
1) प्रत्येक बंधाऱ्यांचे 'रिअल टाईम अपडेट्स'
2) 12 ते 24 तास आधीच पुरस्थितीचा अंदाज
3) आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्रत्येक क्षेत्रातील सविस्तर आणि अचूक माहिती
4) कोण-कोणते मार्ग बंद होण्याची शक्यता आणि कोणते बंद याची सविस्तर माहिती
5) वाहतुकीला मदत आणि 'पीडब्ल्यूडी' विभागाला पूर्व अंदाज
6) वैद्यकीय सेवा तसेच इतर मदतीच्या गोष्टी पोहोचविण्यासाठी 'अलर्ट सिस्टिम'
7) प्रत्येकाला त्याच्या मोबाईलमध्ये केव्हाही घेता येणार अपडेट
यासह या अॅपमध्ये अनेक गोष्टी आहेत की, ज्या प्रशासनाने लागू केल्यास पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळविता येईल.
'यांची' घेतली मदत: या प्रोजेक्टमध्ये कंपनीचे सीईओ हर्षवर्धन साळुंखे यांच्यासह अजिंक्य दीक्षित, शुभम कुलकर्णी, राजवर्धन कुलकर्णी, निखिल नवरे, साक्षी पंडित, मनाली सोनवणे-मोरे, रुचा कोकाटे यांनी परिश्रम घेतले. शिवाय शिवाजी विद्यापीठ, पाटबंधारे विभाग, पीडब्ल्यूडी विभागातील काही अधिकाऱ्यांचेसुद्धा सहकार्य लाभल्याचे साळुंखे यांनी माहिती दिली.
हेही वाचा: