कोल्हापूर - चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या हात, गळ्यावर ब्लेडने वार करीत वायरने गळा आवळून हत्या केली आहे. शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथे ही घटना घडली असून चेतन घोरपडे असे संशयित आरोपीचे नाव आहे तर अर्चना चेतन घोरपडे (वय 25) असे मृत महिलेचे नाव आहे. पत्नीची हत्या करून पतीनेही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची नोंद शिरोळ पोलिसांत झाली आहे.
फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की चेतन आणि अर्चना यांनी गेल्या 8 वर्षांपूर्वी विवाह केला होता. येथील एमआयडीसीमध्ये दोघेही एकत्र काम करत होते. चेतन आपल्या आई आणि आजीपासून दूर होऊन येथील एका सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर राहत होता. काही दिवसांपूर्वी अर्चना दुसऱ्या कंपनीत नोकरी करत होती. दरम्यान, काल पती चेतन याने अर्चनाला घरी बोलावले आणि तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केले तसेच मोबाइल चार्जरच्या वायरने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर चेतनने स्वतः फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
चेतन स्वतः पोलीस ठाण्यात हजर
संशयित आरोपी चेतन घोरपडे यांनी पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने याबाबत आपल्या काकूला माहिती दिली. शिवाय स्वतः आत्महत्येचा प्रयत्नसुद्धा केला. त्यानंतर स्वतः येथील जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर होऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान, मृत अर्चना घोरपडे यांची आई वासंती पुजारी (रा. शिरोळ) यांनी शिरोळ पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन घोरपडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरोळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.