कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील माले येथे घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी घण घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय पाटील असे त्या आरोपी पतीचे नाव असून हत्येनंतर तो स्वतःहून कोडोली पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पत्नी शुभांगी पाटील (वय 30) यांचा 10 वर्षांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील दत्तात्रय पाटील (वय 35) याच्याशी विवाह झाला होता. त्यांना 8 आणि 4 वर्षांची दोन लहान मुलं सुद्धा आहेत. गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू होते. आज पहाटे सुद्धा दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात दत्तात्रय याने शुभांगी यांच्या डोक्यात लोखंडी घन घातला ज्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर दत्तात्रय स्वतःहून कोडोली पोलिसांत दाखल होऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असून पती विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेनंतर संपूर्ण पन्हाळा तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान पोलीस याबाबत अधिक माहिती घेत आहेत.