कोल्हापूर - दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरातल्या सीपीआर रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना घरचा सकस नाश्ता देण्याचे काम करत असलेल्या मुली सर्वांनीच पाहिल्या आहेत. आता अशाच आणखी काही तरुणीपुढे आल्या असून शहरातील गरजू निराधार लोकांसह पोलीस कर्मचाऱ्यांना नाश्ता देताना पाहायला मिळत आहेत. 'हंगर हेल्पर' नावाने त्यांनी आपला हा उपक्रम सुरू केला असून त्यांच्या या उपक्रमाची शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे.
आणखी चार मुलींनी जपली सामाजिक बांधिलकी -
कोल्हापुरातल्या शाहूपुरी बसंत बहार रोड परिसरात राहणाऱ्या नुपूर देशपांडे, श्वेता कलूगडे, दिशा मंचूडिया आणि गुंजन नाडकर्णी या चार महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणी समाजासाठी आपणही काही करायला हवं म्हणत समोर आल्या आहेत. त्यांच्याच काही मैत्रिणी सीपीआर रुग्णालय येथे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज मोफत नाश्ता देत आहेत. हीच प्रेरणा घेऊन समाजातील गरजू आणि निराधार लोकांसह पोलीस बांधवांना सुद्धा दररोज मोफत नाश्ता देत आहेत. कोरोनाच्या या महामारीमध्ये जवळचे लोकं सुद्धा मदतीला धावून येत नाहीत मात्र या तरुणींनी समाजात अजूनही माणुसकी शिल्लक आहे हे दाखवून दिले आहे.
घरच्यांचा विरोध -
या चौघी सुद्धा बसंत बहार रोड परिसरात राहतात. त्यांनी आपल्या घरच्यांना आपण लोकांना मदत करण्याबाबत कल्पना दिली. कोणीही उपाशीपोटी राहु नये यासाठी आपणही सर्वांनी मदत करायला हवी असे त्यांनी आपल्या घरच्यांना पटवून द्यायचा प्रयत्न केला. सुरुवातीला घरच्यांनी सुद्धा विरोध केला मात्र स्वतःच स्वतःकडे असलेल्या पैशातून त्यांनी मदत करायला सुरुवात केली आणि घरचे सुद्धा नंतर तयार झाले. 2 दिवसांपासून त्या शहरातील गरजूंसह पोलिसांना घरचा सकस नाश्ता, बिस्किट पुडे, पाणी देत आहेत. त्यांचे काम पाहून त्यांच्या सोसायटीमधील नागरिक सुद्धा त्यांना वस्तू आणि पैशाच्या रुपात मदत करत आहेत.
कोरोना काळात नागरिकांनी बाहेर पडणे योग्य नाही : बलकवडे
सद्या अनेक सामाजिक संघटना, विविध पक्ष, मंडळ आणि व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यात मदत केली जात आहे. त्यामुळे अनेकजण मदत करताना पाहायला मिळत आहेत. कोरोना काळात त्या सर्वांनी घराबाहेर पडणे योग्य नाही. सर्वांचे काम उल्लेखनीय आहे. मात्र आपल्याला मदत द्यायचीच असेल तर पोलिसांकडून ती गरजूंपर्यंत पोहोचवू असेही पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटले होते. त्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी 'संवेदना' हा उपक्रम सुद्धा सुरू केला आहे. जिल्ह्यातील वाड्यावस्त्यांवर जाऊन पोलीस नागरिकांना मदत करत आहेत. शिवाय योग्य नियोजनामुळे प्रत्येक गरजूपर्यंत मदत पोहीचविण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रत्येकानेच कोरोना काळात बाहेर न पडता आपल्याला सामाजिक सेवा करायचीच असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात आपली मदत द्यावी असे आवाहन करण्यात आले असून ते संबंधीतांपर्यंत पोहोचविण्याची आम्ही जबाबदारी घेऊ असेही म्हटले आहे.
हेही वाचा - राज्यात कुठेही लस निर्मिती प्रकल्प झाला तरी आनंदच - अजित पवार