कोल्हापूर Humanity Of Mahavitaran : गावातील तुकडाभर जिरायत शेतीवर कुटुंबाची गुजराण करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील माद्याळ येथील बाबुराव चौगुले यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यात पदरात चार मुली, एक मुलगा. त्यांचा सांभाळ करत आयुष्याच्या उतारवयाला लागलेल्या बाबुराव यांची तारेवरची कसरत सुरू आहे. (electricity connection to poor person) बेताची आर्थिक परिस्थिती असल्यानं त्यांच्या घरात गेल्या 40 वर्षांत विजेचा प्रकाश पडलाच नाही; मात्र महावितरणच्याच संवेदनशील अधिकाऱ्यांमुळे बाबुराव चौगुले यांचं घर दिवाळीपर्वाला सुरुवात होण्याच्या पूर्वसंध्येला प्रकाशदीप झालं. महावितरणमधील दोन अधिकाऱ्यांच्या दातृत्वामुळं या वृद्धाचं घर प्रकाशमान झालं आहे.
सामाजिक कार्यातून मिळाली 'मास्तर' ही उपाधी : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील माद्याळ या जेमतेम 250 उंबरा असलेल्या गावात बाबुराव मास्तर नावानं परिचित असलेल्या बाबुराव चौगुले हे शिक्षक नाहीत; मात्र अख्खं गाव त्यांना मास्तर नावानं ओळखतं. कधीकाळी गावात त्यांनी मुलांना शिकवण्याचं काम केलं होतं असे गावकरी सांगतात; म्हणून त्यांच्या नावाला मास्तर ही बिरुदावली चिकटली आहे. गावातील कोणत्याही कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याचं काम असो वा एखाद्याच्या निधनानंतरची क्रियाकर्मे. बाबुराव मास्तर एक खांबी किल्ला लढूनच घरी परततात. समाधानाचं आयुष्य जगताना चौगुले मास्तर यांना आर्थिक चणचण भासू लागली. यातच वर्षभरापूर्वी आजारपणानं ग्रासलं. गावातील दानशूर व्यक्तींनी वर्गणी काढून उपचाराचा खर्च भागवला.
महावितरणच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची माणुसकी: गेल्या 40 वर्षांत बाबुराव चौगुले यांच्या घरात विजेचा प्रकाश काही पडला नाही. घरातील अंधारातून वाट शोधण्याचा प्रयत्न 70 वर्षीय बाबुराव मास्तर करत होते. याला महावितरणमधील दोन कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी बळ दिलं. महावितरणचे अधिकारी प्रशांत करनूरकर आणि संग्राम घोरपडे यांनी बाबुराव मास्तर यांची डिपॉझिट भरून वीज जोडणीच्या साहित्यांसह चौगुले यांचं घर गाठलं. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घरातील वीज जोडणी पूर्ण केली आणि घरात दिवाळीच्या पूर्वसंध्येला प्रकाश पडला. यामुळे बाबुराव चौगुले यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
प्रत्येक घरी दिवा, प्रत्येक घरी दिवाळी: महावितरणच्या 'प्रत्येक घरी दिवा, प्रत्येक घरी दिवाळी' या योजनेमधून गावातील प्रत्येक ग्राहकांच्या घरात वीज पोहोचली पाहिजे, असा उद्देश जोपासला आहे. महावितरण कंपनीनं कागल तालुक्यातील माद्या इथल्या बाबुराव चौगुले या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरात गुरुवारी सायंकाळी वीज जोडणी करून त्यांचं घर प्रकाशमय केलंय. यासाठी कागल पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक सोनार, उपविभागीय अधिकारी हेमंत येडगे, वीज कर्मचारी आनंदा ढोणुक्षे, रणजीत कळंत्रे यांनी मदतीचा हात दिला.
हेही वाचा: