कोल्हापूर - शहरातसुद्धा आता गव्यांचे दर्शन झाले आहे. चार गव्यांचा एक कळप शहरातील लक्षतीर्थ वसाहत आणि सुतार मळा परिसरात पहायला मिळाला. येथील स्थानिक नागरिकांनी या गव्यांच्या कळपाला आपल्या कॅमेरात कैद केले आहे. सद्या गव्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गव्यांच्या वावरामुळे शहरात मात्र, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गव्यांचे दर्शन झाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ वनविभागाला आणि अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली असून ते या ठिकाणी दाखल झाले आहेत.
गोकुळ-शिरगावमध्ये गव्यांचा धुमाकूळ -
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरानजीक असलेल्या गोकुळ शिरगावमध्ये मे महिन्यामध्ये दोन गवे मार्ग चुकल्याने भटकल्याचे पाहायला मिळाले होते.त्यावेळी त्यांनी गावात धुमाकूळ घातला होता. आता कोल्हापूर शहरामध्येच गवे पहायला मिळाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वीसुद्धा कोल्हापूर शहरात आले होते गवे -
कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गवे आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी वारंवार हे गवे पहायला मिळतात. शहरात सुद्धा यापूर्वी काही वेळा नागरिकांना गव्यांचे दर्शन झाल्याचे म्हटले जाते. जयंती नाला परिसरात सुद्धा काही व्यक्तींनी गवा पाहिला असल्याचा दावा केला होता.
काही दिवसांपूर्वी पुण्यात गाजले गवा प्रकरण -
पुण्यात ९ डिसेंबरला कोथरूडमधील एका सोसायटीमध्ये गवा आला होता. त्याला रेस्क्यू करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा काही दिवसात बावधन येथील हायवेलगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे असलेल्या जंगलातही गवा दिसला. गव्याच्या मृत्यूमुळे सोशल मीडियावर गदारोळ उडाला होता.