कोल्हापूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुरेशी माहिती न घेता बोलतात आणि स्वतःचे हसे करून घेतात. ग्राम विकास मंत्रालय आणि माझ्याबाबत माध्यमांना चुकीची माहिती दिल्याबद्दल पाटील यांनी आज संध्याकाळपर्यंत दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा त्यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.
आज कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी मुश्रीफ यांना अमराठी म्हटले. 14 व्या वित्त आयोगातील गावांच्या शिल्लक रक्कमेच्या व्याजावर महाराष्ट्राच्या ग्रामविकास खात्याने डल्ला मारला असल्याचा, आरोपही केला होता. याला प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर बदनामीचा दावा करू, असा इशारा दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण माहिती घेऊनच प्रत्येक विधान केले पाहिजे. त्यांच्या अज्ञानाची कीव येते, अशी उपहासात्मक टीकासुद्धा मुश्रीफ यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारचे कोरोना काळातील काम बघून देवेंद्र फडणवीसांचे डोळे पांढरे होतील, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी 'आमचे डोळे आपले भ्रष्टाचार पाहून होतील', असे विधान केले होते. या सर्व भ्रष्टाचारांबाबत महाविकास आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी विधानसभा अधिवेशनची वाट बघत असल्याचेही भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
पाटील यांच्या या वक्तव्यांवर मुश्रीफ चांगलेच संतापले असून, चंद्रकांत पाटीलांनी दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता चंद्रकांत पाटील आपल्या आरोपांवर ठाम राहतात की, मुश्रीफ चंद्रकांत पाटील यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करतात, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.