कोल्हापुर - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाकयुद्ध आपण यापूर्वीही पाहिले आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. काल रविवारी मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून चोख प्रत्युत्तर दिले होते. आता मुश्रीफ यांनी पुन्हा त्यांना लक्ष केले असून, ''इधर उधर की बात ना कर, ये बता काफ़िला क्यू लुटा'' असे म्हंटले आहे. शिवाय मी चंद्रकांत पाटलांना काहीही बोललो नव्हतो, मात्र त्यांना चोमडेपणा करायची काय गरज असेही मुश्रीफ यांनी म्हंटले आहे.
पुढच्या विधानसभा निवडणुकीवेळी फडणवीस कदाचित राज्यसभेवर जातील
काल पुण्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात निवडणूक लढवून दाखवावी असे मुश्रीफ यांना म्हटलं होतं. तोच धागा पकडत चंद्रकांत पाटील यांच्या लोकप्रियतेबाबत मला काही बोलायचं नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि महाविकासआघाडी वर टीका झाली तर मला बोलायला कोणीही रोखू शकत नाही. आपल्या पक्षाच्या नेत्यांचा अपमान झाल्यावर कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करायची नाही का ? असा सवाल करत, पुढच्या विधानसभा निवडणुकीवेळी कदाचित फडणवीस राज्यसभेवर जातील आणि चंद्रकांत पाटील त्यांच्या जागी विधानसभा नागपूर मधून लढवतील, असा खोचक टोलाही मुश्रीफ यांनी यावेळी भाजापाला लगावला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल भाजपचे सोशल मीडिया प्रमुख जिंदल यांनी टीका केली होती, याबाबत भाजपने माफी मागावी असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होतं. अन्यथा किंमत चुकवण्यात तयार राहा असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला होता, त्याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी माफी मागणार नाही म्हणत तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हंटले होते. यावरून रविवारी मुश्रीफ यांनी ''चंद्रकांत पाटलांना इतकी मस्ती कुठून येते, माहित नाही. कोल्हापुरातून पळून जावं लागलेल्या माणसानं प्रामाणिक आणि सोज्वळ अशा मुख्यमंत्र्यांवर टीका करणे सुद्धा योग्य नाही'' असे म्हंटले होते. त्याला चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून उत्तर देत ''आम्ही कोणावरही टीका केली की मुश्रीफ प्रतिक्रिया देतात, त्यामुळे मुश्रीफ यांना कोणता आजार झाला आहे का हे मी त्यांना फोन करून विचारणार'' असल्याचे म्हंटले होते. त्यावर आज मुश्रीफ यांनी कोल्हापुरात प्रतिक्रिया दिली आहे. जिंदाल यांनी केलेल्या टिकेबद्दल भाजपाने माफी मागावी, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय ''इधर उधर की बात ना कर, ये बता काफ़िला क्यू लुटा'' असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा - निवडणूक आयोग राज्यकर्त्यांच्या हुकमाचा विकलांग ताबेदार, शिवसेनेची खरमरीत टीका