कोल्हापूर : सुळकुड पाणी योजना रद्द न झाल्यास रक्तपात होईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. इचलकरंजीकरांना दूधगंगेतून पाणी देण्याऐवजी पर्याय उपलब्ध असल्यानं यासंदर्भात येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पर्याय पटवून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दूधगंगा बचाव कृती समितीची बैठक कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.
सुळकड योजनेचा आग्रह सोडून द्यावा : कोणत्याही परिस्थितीत इचलकंजीला पाणी द्यायचं नाही, यावर एकमत झालं आहे. आता ही लढाई तीव्र झाली असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. इचकरंजीला तीन वेळा पाणीयोजना मंजूर झाल्या आहेत. मात्र त्यांनी मजले योजना मंजूर करून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत सुळकुड योजना होऊ द्यायची नाही, असा निर्धार त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून पुन्हा चार दिवसात बैठक घेवू. ही योजना होऊ द्यायची नाही अशी शपथ घेवू असंही ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढू, इचलकरंजीकरांनी सुळकड योजनेचा आग्रह सोडून द्यावा, असं आवाहनही मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केलं.
पाकिस्तानला देखील पाणी द्यायला आम्ही तयार : माजी आमदार उल्हास पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा खरपूस समाचार घेतला. खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीला पाणी देणार नाही म्हणता, इचलकरंजी काय पाकिस्तानात आहे काय? असा सवाल उपस्थित केला होता. याचा संदर्भ घेत उल्हास पाटील म्हणाले, आम्ही पाकिस्तानला देखील पाणी द्यायला तयार आहे. मात्र त्यांनी मागणी योग्य पद्धतीने मांडावी. पंचगंगेचं शुद्धीकरण राहिले बाजूला आता वारणा, कृष्णा नद्या सोडून तुम्ही दूधगंगेच्या पाण्यासाठी आग्रही आहात, हे राजकारण कशासाठी असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
खासदार आमदारांसह मंत्रीही एकवटले : कोणत्याही परिस्थितीत सुळकुड योजना होऊ द्यायची नाही, असा निर्धार करत कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे, के पी पाटील, उल्हास पाटील यांच्यासह कागलमधील कट्टर विरोधक भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आले. आता एक मंत्री, खासदार, दोन आमदार, तीन माजी आमदार विरुद्ध एक खासदार अशी लढाई भविष्यात कोणतं वळण घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा -