कोल्हापूर - कोरोनामुळे देशातील आर्थिक चक्रे थांबल्याने सर्वच व्यवसाय कोलमडले. याचा फटका कोल्हापुरी पायतानलादेखील बसला. संपूर्ण व्यवसाय चार महिने ठप्प झाल्याने आर्थिक बेरोजगारीची कुऱ्हाड चप्पल व्यावसायिकांवर कोसळली होती. मात्र अनलॉक प्रक्रियेमुळे कोल्हापुरी चप्पलला उर्जितावस्था येत आहे. पर्यटन सुरू झाल्याने कोल्हापुरी पायतानला मागणी वाढत आहे. मात्र सरकारने चार महिन्यातील कर व वीजबिल माफ करावे, अशी मागणी या व्यावसायिकांकडून होत आहे.
अनलॉकनंतर पुन्हा अच्छे दिन
जिल्ह्यातील जवळपास 15 हजार कामगार कोल्हापुरी पायतानाचा व्यवसाय करतात. तर 8 हजारपेक्षा जास्त कुटुंब या व्यवसायांवर अवलंबून आहेत. मात्र कोरोनामुळे पर्यटन बंद राहिल्याने चर्मकार व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. साहित्य खरेदी करण्यापासून ते चप्पल विकण्यापर्यंतचे सर्व चक्र ठप्प झाले होते. जवळपास प्रत्येक कामगारांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेच तर त्याशिवाय अनेकांनी या व्यवसायाला रामराम ठोकला. मात्र अनलॉक प्रक्रियेनंतर कोल्हापुरी चप्पलला पुन्हा अच्छे दिन आले असल्याचे चित्र आहे.
पर्यटकांची पावले दुकानांकडे
पर्यटन वाढू लागल्याने पर्यटकांची पावले दुकानांकडे वळू लागली आहेत. मात्र आर्थिक फटका बसलेल्या व्यावसायिकांनी लॉकडाऊनमधील कर, वीजबिल माफ करावे, अशी मागणी केली आहे. तसेच पर्यटकांचा प्रतिसाद मिळत असून आर्थिक घडी पुन्हा बसत असल्याचे व्यावसायिक सांगतात. बऱ्याच वर्षांपासून कोल्हापुरी पायतानाचे पेटंट व्हावे, अशी मागणी आहे. मात्र कर्नाटक सरकारने यावर हक्क सांगितल्याने कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा लढा सुरू केला आहे.