कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने विष पिऊन आत्महत्या केली. प्राजक्ता सुरेश बाऊचकर असे या तरुणीचे नाव आहे. आत्महत्येस जबाबदार म्हणून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्राजक्ताने आत्महत्या केल्यानंतर या तिघांमधील एकानेही विष घेतले आहे.
संशयित आरोपीनेही घेतले विष
प्राजक्ताने महाविद्यालयातून येताच विष घेतले. तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला. मुलीच्या आईने गावातील अजित तानाजी पाटील, प्रदीप कृष्णा पाटील व अक्षय गणपती चव्हाण या तिघांविरोधात प्राजक्ताची छेडछाड केल्याची तक्रार पन्हाळा पोलीसात दिली आहे. यावरुन तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, प्राजक्ताने आत्महत्या केल्याचे समजताच गावातील अजित पाटील यानेही विष घेतले. तो देखील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. प्रदीप व अक्षय याने प्राजक्ताच्या मोबाईलवर संदेश पाठवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, प्राजक्ताच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी अजित याच्या घरात जाऊन तोडफोड केली. गावात अजुनही तणावाचे वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संशयित आरोपी प्रदीप पाटील व अक्षय चव्हाण यांना पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.