कोल्हापूर- 'तुम जमीन वालोपर रेहम करो, अस्मानवाला तुमपर रेहम करेंगा!' या उदात्त हेतूने कोल्हापुरातील मुस्लीम बांधव हिंदू बांधवांच्या मदतीला धावत आहेत. कोरोनामुळे आपले सुद्धा परके झाले आहेत. कोरोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास, त्याचे नातेवाईक देखील त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार देतात. अशा वेळी हेच मुस्लीम बांधव आज कोरोनामुळे मृत्यू झालेल्या हिंदू लोकांवर अंत्यसंस्कार करत आहेत. पाहुयात ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट.
पुरोगामी शहर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या कृतीतून आणि विचारातून नीतिमूल्ये या मातीत रुजवली, आणि त्याचा वारसा आजही कोल्हापूरकर चालवत आहेत. कोरोनामुळे सध्या जगात हाहाकार सुरू आहे. दिवसेंदिवस कोल्हापुरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. वाढत्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांना धीर देण्याची गरज आहे. अशावेळी कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी गरजू व्यक्तींसाठी रस्त्यावर उतरली आहे.
हिंदू, शीख, बौद्ध धर्मांच्या लोकांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार
कोरोनामुळे अनेकांनी आपले खरे रूप दाखवले. अनेकांनी आपले नाते वाऱ्यावर सोडून दिले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडू लागल्या. पण मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानून बैतुलमाल कमिटीने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्व जातीच्या लोकांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या, नातेवाईक नसणाऱ्या तसेच नातेवाईक असून सुद्धा अंत्यसंस्काराला न येणाऱ्या व्यक्तीवर त्याच्या धर्मातील प्रथेनुसार कोल्हापुरातील मुस्लीम बांधवांकडून अत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
'अशी' जपली माणूसकी
कोल्हापुरातील एक घटना अशी की, एक व्यक्ती अलगीकरणात असताना त्याचा मृत्यू झाला, त्याचे नातेवाईक त्याला सोडून गेले. त्याच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागली, या सर्व प्रकाराची माहिती फोनवरून बैतुलमाल कमिटीच्या सदस्यांना मिळाली. माहिती मिळताच सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, व त्या मृतदेहावर पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले.
कॉल येताच घटनास्थळी दाखल
बैतुलमाल कमिटीचे सदस्य आपल्या जीवाची परवा न करता सेवा देत आहेत. दिवसरात्र यांची सेवा सुरू आहे. अनेक कोरोनाबाधित घरूनच उपचार घेत असतात, अशावेळी त्यांचा मृत्यू झाल्यास जर नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास नकार दिला, तर अशावेळी बैतुलमाल कमिटीला फोन करून माहिती दिली जाते. माहिती मिळताच या कमिटीचे सदस्य तातडीने घटनास्थळी हजर होतात, व मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारतात.
आतापर्यंत १४०० लोकांवर अंत्यसंस्कार
बैतुलमाल कमिटीच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांपासून सेवा सुरू आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृत्यूची संख्या अधिक आहे. या दीड वर्षांच्या कालावधीत बैतुलमाल कमिटीच्या वतीने हिंदू, शीख, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन या धर्मातील जवळपास १४०० लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
माणुसकी धर्म सोडणार नाही
मुस्लिम धर्माने मोठी शिकवण जगाला दिली आहे. जर आपण मानवाची सेवा केली, त्यांच्यावर दया दाखवली तर अल्लाह देखील आपल्यावर दया दाखवतो. या भावनेने बैतुलमाल कमिटी जनतेची सेवा करत आहे. विनामोबदला सेवा पुरवली जात आहे. जर लोकांनी आम्हाला केवळ आशीर्वाद जरी दिले तरी देखील आम्हाला देवाची सेवा केल्याचे समाधान मिळते अंस जाफर सय्यद यांनी म्हटले आहे.
महिन्याला ३०० लोकांना राशनचे वाटप व उपचारासाठी आर्थिक मदत
गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, अनेकांवर उपासमारीची वेळ आली. मात्र एकही कुटुंब उपाशी झोपणार नाही, याची काळजी कमिटीने घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३०० कुटुंबांना महिन्याला राशन मोफत दिले जाते. तर उपचारासाठी लोकांना आर्थिक मदत दिली जात आहे. दरम्यान येत्या दोन वर्षांत शहरातील गरीब व गरजू लोकांसाठी रुग्णालय उभारण्याचा मानस असल्याचे देखील कमिटीच्या सदस्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - डोअर टू डोअर लसीकरणासंदर्भात महापालिकेला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश