कोल्हापूर - तुम्हीच आमच्यासाठी देवदूत आहात. स्वतःचे प्राण धोक्यात घालून आमची सेवा करत आहात. तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या. असं म्हणत कोल्हापुरातील एका डॉक्टरने एनडीआरएफच्या जवानावर मोफत शस्त्रक्रिया केली. आज बालिंगा येथे बचावकार्य करत असताना जवान जखमी झाला. त्यामुळे त्याच्या हाताला मोठी इजा झाली. त्यानंतर बालिंगा येथे एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र डॉक्टरानी त्याच्यावर उपचार केले, मात्र एक रुपयाही घेतला नाही. उलट भावूक झालेल्या डॉक्टराने जवानासमोर हात जोडले. तुम्हीच आमचे देवदूत आहात अशी भावना त्यांच्याकडे व्यक्त केली.
गेल्या चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात महापूराची स्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे कोल्हापूरातील आजही भीतीचे ढग दाटले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. एनडीआरएफच्या जवानाकडून पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे काम सुरू आहे. महापूरात बचावकार्य राबवत असताना बोटीतून पडून आज एनडीआरएफचा जवान जखमी झाल्याची घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या ‘एनडीआरएफ’चा जवान दयानंद गुरव याच्या हातावर सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. करवीर येथील डॉ. अमर देसाई यांनी आपल्याच रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया आणि औषधे दिली.
पैसे केले माफ
सोमवारी दुपारी करवीर तालुक्यातील पाडळीखुर्द येथे महापूराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पुण्यातील ‘एनडीआरएफ’ ची रेस्क्यू बोट जवानासह गावात पोहचली. पूरात आडकलेल्या कुटूंबांना घेऊन रेस्क्यू बोट काठावर पोहचली, बोटीतील जवान दयानंद गणपती गुरव हे तोल जाऊन पाण्यातील खडकावर आपटले. त्यांच्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली. वेदनेने विव्हळणाऱ्या जवान गुरव यांना त्यांच्या सहकार्यांनी तातडीने बालिंगा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने डॉ. अमर देसाई, डॉ. दीपक शिंदे, डॉ. चंद्रकांत नलवडे यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शस्त्रक्रिया यशस्वी केली. हे जवान सेवा करण्यासाठी कोल्हापूरात आले होते, त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या शस्त्रक्रियेचे पैसे स्विकारण्यास संबधीत डॉक्टरांनी नकार दिला. तसेच माणुसकीच्या भावनेने जखमी जवानाला मोफत औषधे देऊन पाठवण्यात आले. ऐन महापुरात कोल्हापूरच्या डॉक्टरांनी माणुसकीचे दर्शन घडवल्याने जवान आणि सर्व टीमने कोल्हापूरकरांच्या माणुसकीचे आभार मानले.
कोल्हापूरकर लय भारी
कोल्हापुर कर म्हणजे साफ दिलाची माणसं. कोल्हापूरकरांच्या दिलदार व्यक्तिमत्वाची चर्चा जगभरात होते. जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव कोल्हापूरकरांच्या कर्तुत्वाने जाहीर झाले आहे. त्याचाच प्रत्यय आज एनडीआरएफच्या जवानांना आला. त्यामुळे गुरव यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर जवानांच्या तोंडातून कोल्हापूरकर लय भारी असे शब्द म्हटले.
हेही वाचा - 'सरकार जागवा, व्यापार वाचवा' नारा देत उपराजधानीत व्यापाऱ्यांचे आंदोलन