कोल्हापूर - माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आमदार चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केली. चंद्रकांत पाटील हे आंबा पडल्यासारखे अचानक मोठे झाले. पण मोठे झालेल्यांना पायदळी यायला वेळ लागत नाही, असा टोला माजी आमदार क्षीरसागर यांनी लगावला. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सीपीआर येथे खाटा वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
चंद्रकांत पाटलांना युतीचा इतिहास माहीत नसेल. गेल्या तीस वर्षांपासून भाजप आणि सेना युती होती. या तीस वर्षांत मातोश्रीवरील नेत्यांनी कधीही मीडियाला बाईट दिला नाही. ते फक्त सामनामधून व्यक्त होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरी या सहा वर्षांत मीडियाला बाईट दिला का? असा सवाल त्यांनी चंद्रकांत पाटलांना विचारला. उद्धव ठाकरेंना कोरोनामध्ये मुलाखत देता आली नाही. त्यांनी इतर कोणत्याही चॅनेलला मुलाखत न देता त्यांनी फक्त सामनालाच एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यावरून क्षीरसागर यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
चंद्रकांत पाटलांच्या टीकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर परिणाम होणार नाही. अत्यंत शांत आणि संयम दाखवत मुख्यमंत्री कोरोनावर मात करत आहेत. गेल्या पाच वर्षांत जसा दिंडोरा पिटवत काम केले म्हणजे कारभार करणे नव्हे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम राज्यातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे दिंडोरा पिटून राज्यकारभार होत नाही, हे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ध्यानात घ्यावे, असेही ते म्हणाले. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो हे नारायण राणेंनी अनुभवल आहे. त्यामुळे टीका करताना विचार करून करावी, असा सल्लाही क्षीरसागर यांनी दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआर रुग्णालयाला जवळपास एक कोटी रुपयांच्या खाटा, व्हेंटिलेटरसह इतर साहित्याची मदत देण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, वैशाली क्षीरसागर, सीपीआरचे अधिष्ठाता चंद्रकांत म्हस्के उपस्थित होते.