कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीला पूर आल्याने आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी ग्रामस्थांची जीवघेणी वाहतूक सुरू आहे.
जांभळी खोऱ्याला बेटाचे स्वरुप...जीवनावश्यक वस्तूंसाठी पुरातून नागरिकांची जीवघेणी वाहतूक कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सध्या शहरातील भागात जोर ओसरला असला तरीही नद्यांच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत आहे. त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीला पूर आला आहे. नदीवर असणारे छोटे मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. जांभळी खोऱ्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच जांभळी खोऱ्याला बेटाचे स्वरुप आले आहे, तर मुख्य पोर्ले पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी ग्रामस्थांची जीवघेणी कसरत सुरू आहे. आज सकाळी दुधाची वाहतूक देखील ग्रामस्थांनी कमरेपर्यंत आलेल्या पाण्यातून केली. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी आसपासच्या ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या मार्गावरील धोकादायक वाहतूक थांबवणे गरजेचे आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास सर्व धरणं भरली आहेत. त्यामुळे सध्या धरणांतून विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांचे प्रवाह वाढले आहेत. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने कृष्णेला पूर आला आहे. सांगली आणि कोल्हापुरातील अनेक भागांत पाणी शिरले असून स्थानिकांच्या स्थलांतराचे काम अद्याप सुरू आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हा प्रशासन सक्रिय झाले आहेत.