कोल्हापूर - केरळ-तामीळनाडू मधून होणाऱ्या लाकडांच्या वाहतुकीसोबत कोल्हापूरातील 'टिंबर मार्केट' परिसरात गोल लाल बुब्बुळाची पाल आल्याचे सांगण्यात येत आहे. निमास्पीस ग्रासीलीस या गोल बुबुळाच्या पालीच्या आढळ क्षेत्राची व्याप्ती आणि पुनर्वर्णन करणारा शोधनिबंध 'झूटॅक्सा' या अंतराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रकाशीत झाला. या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल तसेच शिवाजी विद्यापीठाचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक सुनिल गायकवाड आणि बीएनएचएसचे सौनक पाल यांचा सहभाग आहे. सदरचा शोधनिबंध हा प्रा. सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अक्षय खांडेकर यांच्या पीएचडी संशोधनाचा भाग आहे.
मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गीक अधिवासाच्या बाहेर होणाऱ्या प्राण्यांच्या प्रसाराचा त्या अधिवासावर आणि त्या प्राण्यांवर काय परिणाम होतो हे तपासण्यासाठी दीर्घकालीन संशोधन करण्याची गरज आहे.- प्रा. सुनिल गायकवाड
निमास्पीस ग्रासीलीस' ही पाल छोटा आकार आणि आकर्षक रंगामुळे स्पष्टपणे वेगळी ओळखता येते. या पालींचे नर माद्यांपेक्षा अधिक आकर्षक असतात. तसेच या पाली दिनचर असून दिवसा आपले भक्ष्य पकडण्यासाठी बाहेर पडतात.- अक्षय खांडेकर.
निमास्पीस ग्रासीलीस या गोल बुबुळाच्या पालीचा शोध १८७० मधे रिचर्ड बेडोम या ब्रीटीश संशोधकाने लावला. अंगावरील आकर्षक रंग आणि छोट्या आकारावरुन या पाली लक्ष वेधून घेतात. त्यांच्या या आकर्षक रंगावरुनच त्यांचे नामकरण 'ग्रासीलीस' असे केले आहे. मूळ संशोधन पत्रिकेमधे ही पाल पालघाटच्या पर्वतांवर मिळाल्याचे नमूद केले आहे. पश्चिम घाटाला दक्षिण आणि मध्य अशा दोन भागांत खंडीत करणारा 'पालघाट गॅप' हा केरळ आणि तमिळनाडू या राज्यात पसरलेला आहे. सदरच्या संशोधनामधे ही पाल पालघाट गॅपच्या साधारणतः ७० किमी. परिघामधे आढळून आली.
या संशोधनामधे 'निमास्पीस ग्रासीलीस' ही पाल तिचा नैसर्गीक अधिवास सोडून इतरत्र प्रसारीत झाल्याची पहीलीच नोंद कोल्हापूरातील टिंबर मार्केट परिसरातून करण्यात आली. ही पाल प्रथमतः विवेक कुबेर यांना टिंबर मार्केट परिसरात निदर्शनास आली. त्यांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे पुढे या पालीचा अधिकचा अभ्यास करण्यात आला.